Jabalpur Cruise Accident:मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये बरगी डॅममध्ये झालेल्या क्रूझ अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. नऊ जणांच्या मृत्यूसह आईला घट्ट बिलगलेल्या त्या निष्पाप चिमुकल्याचा फोटो पाहून प्रत्येक डोळे पाणावले. या भीषण दुर्घटनेनंतर आता क्रूझचा कॅप्टन महेश पटेल याने पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आपली बाजू मांडता अपघाताची माहिती दिला.
कॅप्टन महेश पटेलने दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी जेव्हा ही फेरी सुरू झाली, तेव्हा हवामान पूर्णपणे सामान्य होते. क्रूझ सुरू होऊन २० मिनिटे झाली होती, तेव्हा अचानक वेगाने वारे वाहू लागले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पायलटने क्रूझ तात्काळ किनाऱ्याकडे वळवली. अवघ्या ५ ते ७ मिनिटांत लाटा इतक्या वाढल्या की त्या क्रूझवर धडकू लागल्या. इंजिन रूममध्ये पाणी भरू लागल्याने क्रूझवरील नियंत्रण सुटले आणि अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना क्रूझ पलटली.
लाईफ जॅकेट घालण्यास नकार
कॅप्टनने दावा केला की, हवामान बिघडल्यावर प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक लोक नाच-गाण्यात आणि आनंद लुटण्यात मग्न असल्याने त्यांनी सुरुवातीला जॅकेट घालण्यास नकार दिला.
"जेव्हा जोराचा वारा वाहू लागला तेव्हा मी कर्मचाऱ्यांना सर्वांना लाईफ जॅकेट्स द्यायला सांगितले. किनाऱ्यावर पोहोचायला साधारण १० मिनिटे लागतात. पण बोट किनाऱ्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्याआधीच ती उलटली. आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न केले पण बोट किनाऱ्याच्या कोणत्याही भागापर्यंत पोहोचायला तयारच नव्हती. लाईफ जॅकेट वाटले होते तरी सर्वच प्रवाशांनी त्याचे पालन केले नाही. काही लोक खालच्या मजल्यावर नाचत होते. माझ्या मुलाने मला सांगितले की त्यांनी लाईफ जॅकेट्स घातले नाहीत. मी तिथे गेलो आणि त्यांना सांगितले की हवामान बिघडले आहे त्यामुळे तुम्ही जॅकेट घालून घ्या," असं पटेलने सांगितले.
लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
"मी अजूनही झोपू शकलो नाही..."
महेश पटेलने हात जोडून पीडित कुटुंबांची माफी मागितली आहे. "मी गेल्या तीन दिवसांपासून नीट जेवलो नाही की झोपलो नाही, माझ्या डोळ्यासमोर सतत ते निष्पाप जीव आणि मुलं येत आहेत," असे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. स्वतःचा जीव वाचवण्यापूर्वी आपण ३ ते ४ लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले आणि आपण स्वतः सर्वात शेवटी क्रूझ सोडली, असा दावाही त्याने केला.
सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती
या दुर्घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशासनाकडून हवामानाबाबत कोणतीही अधिकृत पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, अशी माहिती पायलटने दिली. नियमानुसार क्रूझवर तीन कर्मचारी असणे आवश्यक असताना त्या दिवशी केवळ दोनच कर्मचारी तैनात होते. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या दिवशी सुरक्षा रक्षणासाठी सोबतीला असणारी रेस्क्यू बोटही उपलब्ध नव्हती.
शोधमोहीम अजूनही सुरूच
या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती आले असून २८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय लष्कराची पथके अजूनही बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.
Web Summary : Captain of the Jabalpur cruise that capsized, killing nine, apologized, stating passengers ignored instructions to wear life jackets. He claims the cruise was hit by sudden strong winds. Rescue operations continue for the missing.
Web Summary : जबलपुर में क्रूज पलटने से नौ लोगों की मौत हो गई। कैप्टन ने माफी मांगते हुए कहा कि यात्रियों ने लाइफ जैकेट पहनने के निर्देश को अनसुना कर दिया। अचानक तेज हवाओं से क्रूज पलट गया। लापता लोगों की तलाश जारी है।