Join us
Daily Top 2Weekly Top 5

इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:48 IST

Donald Trump On EU: इराणसोबतच्या युद्धात वारंवार अमेरिकेकडे दुर्लक्ष करणं युरोपियन युनियनला (EU) महागात पडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर २५ टक्के टॅरिफ लादलं आहे.

Donald Trump On EU: इराणसोबतच्या युद्धात वारंवार अमेरिकेकडे दुर्लक्ष करणं युरोपियन युनियनला (EU) महागात पडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर २५ टक्के टॅरिफ लादलं आहे. वास्तविक, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे ट्रम्प यांना असा टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्या मागील सर्व टॅरिफ निर्णयांना रद्दही केलं. असं असूनही, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत मागच्या दारानं नवीन आयात शुल्क लागू केलंय.

पुढील आठवड्यापासून युरोपियन युनियनमधून आयात केल्या जाणाऱ्या कार आणि ट्रकवर शुल्क वाढवून २५ टक्के करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. या पावलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, युरोपियन युनियन आपल्या मान्य व्यापार कराराचं पालन करत नाहीये; मात्र, त्यांनी आपल्या आरोपांचा सविस्तर तपशील दिलेला नाही.

सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर

१५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ निश्चित झाला होता

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेएन यांच्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये एक व्यापार करार झाला होता, ज्याअंतर्गत बहुतेक वस्तूंवर १५ टक्के शुल्काची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. हा शुल्काचा आराखडा 'टर्नबेरी करार' या नावाने ओळखला जातो, ज्याचं नाव स्कॉटलंडमधील ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवरून ठेवण्यात आलं होतं. दोन्ही बाजूंनी यापूर्वी हा करार कायम ठेवण्याची वचनबद्धताही व्यक्त केली होती.

१० टक्क्यांच्या पुढे ट्रम्प यांनी कशी केली वाढ?

या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर या कराराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, ट्रम्प यांच्याकडे आर्थिक आणीबाणी घोषित करून युरोपियन युनियनच्या उत्पादनांवर शुल्क लावण्याचा कायदेशीर अधिकार नाही. या निर्णयानंतर शुल्क मर्यादा प्रभावीपणे १० टक्क्यांपर्यंत मर्यादित झाली होती. मात्र, नवीन शुल्क रचना लागू करण्यासाठी ट्रम्प प्रशासन आता व्यापार असंतुलन आणि राष्ट्रीय सुरक्षा जोखमींची तपासणी करत आहे.

करारातून ६० कोटी युरो बचतीची होती अपेक्षा

युरोपियन युनियनच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेमुळे युरोपियन युनियनसोबतच्या कराराच्या उल्लंघनाचा धोका निर्माण होऊ शकतो. द्विपक्षीय करारामुळे युरोपियन वाहन उत्पादकांना दरमहा ५० ते ६० कोटी युरोची बचत होऊ शकली असती, असं युरोपियन युनियनचं म्हणणं आहे. आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये अमेरिका आणि युरोपियन युनियन दरम्यान वस्तू आणि सेवांचा व्यापार १.७ लाख कोटी युरो (सुमारे २ लाख कोटी डॉलर) इतका राहिला, जो सरासरी दररोज ४.६ अब्ज युरोच्या बरोबरीचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Imposes Tariffs on EU for Iran Stance, Hitting Businesses

Web Summary : Trump imposed 25% tariffs on EU goods due to disagreements over Iran. Despite legal challenges, Trump leveraged loopholes, impacting car and truck imports. This move risks global economic consequences and violates existing trade agreements, potentially costing European automakers millions.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरडोनाल्ड ट्रम्पटॅरिफ युद्ध