Gold Silver Rate Today: शुक्रवारी कमोडिटी बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली. सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु बाजाराची चाल याच्या उलट राहिली. एमसीएक्स (MCX) वर शुक्रवारी रात्री सुमारे ११:२१ वाजता दोन्ही मौल्यवान धातू वाढीसह व्यवहार करताना दिसले.
MCX वर सोने १.५० लाखांच्या पार, चांदीची मोठी झेप
देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार तेजी नोंदवण्यात आली. एमसीएक्सवर सोन्याचे भाव १,५१,३१९ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर व्यवहार करताना दिसले. तसेच, चांदीने मोठी झेप घेत २,४७,५०० रुपये प्रति किलोचा स्तर गाठला. कच्च्या तेलाचा दबाव असूनही औद्योगिक मागणी आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे मिळालेल्या पाठिंब्यामुळे चांदीतील या तेजीनं गुंतवणूकदारांना थक्क केलं आहे.
सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
कच्च्या तेलाचा दबाव आणि जागतिक स्तरावरील भाव
बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. आज क्रूड ऑईल १०२.५० डॉलरवर पोहोचले आहे, जे गेल्या ४ वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. तेलाच्या महागाईमुळे मौल्यवान धातूंमध्ये विक्री वाढेल या तज्ज्ञांच्या शक्यतेच्या विरुद्ध बाजारात मजबूती दिसून आली. कॉमेक्स (COMEX) वर स्पॉट गोल्ड ४,६२५.६० डॉलर प्रति औन्सच्या आसपास स्थिर आहे, तर चांदी २.४५ टक्क्यांच्या जोरदार वाढीसह ७५.८४० डॉलरवर पोहोचली. महागाईपासून वाचण्यासाठी गुंतवणूकदार 'हेजिंग' म्हणून सोन्यातील गुंतवणूक कायम ठेवत असल्याचे बाजार तज्ज्ञांचं मत आहे.
किमतीत वाढ का झाली?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, सोन्याच्या किमतीत एका महिन्याच्या नीचांकी पातळीवरून सुधारणा झाली आहे. डॉलर इंडेक्स आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये आलेल्या मंदीमुळे सोन्याला बळकटी मिळाली आहे. गांधी यांनी सांगितलं की, प्रमुख सपोर्ट लेव्हल जवळ खरेदी झाल्यामुळे किमती स्थिर होण्यास मदत झाली. डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक खरेदीदारांसाठी सोने स्वस्त होते, ज्यामुळे मागणीत सुधारणा दिसून आली आहे.
