आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील लेडो-लेखापाणी परिसरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एक जिवंत बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. हा बॉम्ब मानवी वस्ती असलेल्या भागात आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, भारतीय लष्कराने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि तांत्रिक कौशल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिनसुकियामधील एका रहिवासी भागात हा गंजलेला बॉम्ब स्थानिक नागरिकांना दिसला. हा बॉम्ब सुमारे १२ इंच लांब आणि ६ इंच व्यासाचा होता. बॉम्बची माहिती मिळताच स्थानिकांमध्ये घबराट पसरली आणि परिसरात अफरा-तफरीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले.
'रेड शील्ड सॅपर्स'कडून रेस्क्यू ऑपरेशन
लष्कराची विशेष बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लष्कराने प्रथम संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आणि सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. तज्ज्ञांनी या बॉम्बची पाहणी केली असता, तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याचे स्पष्ट झाले.
अतिशय काळजीपूर्वक केला निष्प्रभ
हा बॉम्ब जिवंत असल्याने तो तिथून हलवणे अत्यंत जोखमीचे होते. लष्कराच्या पथकाने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने हा बॉम्ब ताब्यात घेतला आणि लोकवस्तीपासून दूर एका निर्जन स्थळी नेला. तिथे नियंत्रित स्फोट घडवून आणत हा बॉम्ब सुरक्षितपणे निकामी करण्यात आला. सुदैवाने, या मोहिमेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जिवंत
ईशान्य भारत हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान लष्करी हालचालींचे मोठे केंद्र होता. त्यामुळे या भागात आजही अनेकदा त्या काळातील स्फोटके किंवा अवशेष सापडत असतात. "नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे," असे म्हणत भारतीय लष्कराने या मोहिमेद्वारे आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
Web Summary : A WWII-era bomb was discovered in Assam's Tinsukia district, causing panic. The Indian Army swiftly secured the area, evacuated residents, and safely defused the bomb, preventing a potential catastrophe. No casualties or damage were reported.
Web Summary : असम के तिनसुकिया जिले में द्वितीय विश्व युद्ध के समय का एक बम मिला, जिससे दहशत फैल गई। भारतीय सेना ने तुरंत इलाके को सुरक्षित किया, निवासियों को निकाला, और बम को सुरक्षित रूप से निष्क्रिय कर दिया, जिससे एक संभावित तबाही टल गई। कोई हताहत या क्षति नहीं हुई।