इराणच्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय खलाशाचा मृत्यू; १५ जणांची सुटका, दिल्लीचा तेहरानला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 20:08 IST2026-03-12T19:49:58+5:302026-03-12T20:08:34+5:30
समुद्रात इराणचा थरार, अमेरिकन जहाजाला उडवले, एका भारतीयाचा मृत्यू

इराणच्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय खलाशाचा मृत्यू; १५ जणांची सुटका, दिल्लीचा तेहरानला थेट इशारा
Indian Sailor Killed: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धात एका भारतीय खलाशाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ११ मार्च रोजी इराणने केलेल्या आत्मघातकी बोटीच्या हल्ल्यात अमेरिकन मालकीचे तेलवाहू जहाज एमटी सेफसी विष्णूला लक्ष्य झाले. या भीषण घटनेमुळे भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्याच्या इराणच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
नेमकं काय घडलं?
इराकच्या बसरा शहराजवळ एमटी सेफसी विष्णू हे जहाज माल भरण्याचे काम करत असताना, स्फोटकांनी भरलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या सुसाईड स्पीडबोटने या जहाजाला जोरदार धडक दिली. प्राथमिक अहवालानुसार, हा हल्ला इराणने केला आहे. या जहाजावर एकूण १६ भारतीय खलाशी होते, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर उर्वरित १५ जणांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
इराणची कबुली आणि 'अंडरवॉटर' ड्रोनचा वापर
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "पर्शियन गल्फमध्ये दोन तेलवाहू जहाजे अंडरवॉटर ड्रोनच्या साहाय्याने उडवून दिली," असा दावा इराणने केला आहे. यामध्ये सेफसी विष्णू आणि झेफिरोस या दोन जहाजांचा समावेश आहे.
भारताचा इराणवर पहिला थेट हल्ला!
आतापर्यंत या युद्धात सावध भूमिका घेणाऱ्या भारताने आता इराणवर थेट टीका केली आहे. "व्यावसायिक जहाजांना युद्धाचे लक्ष्य बनवणे अत्यंत निंदनीय आहे," अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने इराणचा निषेध केला. इतकेच नाही तर, भारताने संयुक्त राष्ट्रात इराणविरुद्धचा प्रस्ताव स्वीकारुन तेहरानला स्पष्ट संदेश दिला.
पंतप्रधान मोदींकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पश्चिम आशियातील अरब देशांवरील इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. सौदी अरेबिया आणि यूएईच्या नेत्यांशी चर्चा करताना त्यांनी या भागातील शांततेवर भर दिला. दरम्यान, भारताकडे येणारे थायलंडचे मयुरी नारी हे जहाजही होर्मुझच्या सामुद्रधुनीत हल्ल्याचे बळी ठरले असून, त्यातील तीन कर्मचारी बेपत्ता आहेत.