किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचा 'सर्जिकल स्ट्राईक'! जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा गेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:03 IST2026-02-22T14:02:18+5:302026-02-22T14:03:57+5:30
गेल्या महिनाभरापासून जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचा 'सर्जिकल स्ट्राईक'! जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा गेम
गेल्या महिनाभरापासून जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील घनदाट जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी झालेल्या एका भीषण चकमकीत लष्कराने 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका टॉप कमांडरचा खात्मा केला असून, दोन दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत. मारला गेलेला दहशतवादी हा १० लाखांचे इनाम असलेला कुख्यात सैफुल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
३६ दिवसांच्या ऑपरेशनला मोठे यश
किश्तवाडच्या छातरू भागातील जंगलात गेल्या ३६ दिवसांपासून दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर आणि एसओजीच्या संयुक्त पथकाने या परिसरात दहशतवाद्यांना वेढा घातला होता. रविवारी दुपारी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला जागीच ठार केले. यापूर्वी जैशचा आदिल नावाचा दहशतवादी मारला गेला होता, मात्र सैफुल्ला आणि त्याचे साथीदार हुलकावणी देत होते. अखेर आज लष्कराने त्यांचा गेम केला आहे.
ड्रोन आणि हेलिकॉप्टरने निगराणी
दहशतवाद्यांना निसटण्याची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. घनदाट जंगल असल्यामुळे ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जात आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे दोन साथीदार जखमी अवस्थेत जंगलात लपून बसले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.
इंटरनेट सेवा खंडित; लष्कराचा कडक पहारा
चकमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून किश्तवाडमधील छातरू, सिंहपुरा, चिंगम आणि कौशल या भागात मोबाइल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी एकमेकांशी संपर्क साधू नये किंवा अफवा पसरू नयेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पासरकुट आणि आजूबाजूच्या गावांमध्ये लष्कराने कडक पहारा तैनात केला आहे.
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले
गेल्या काही दिवसांपासून जम्मू भागात दहशतवादी कारवाया वाढवण्याचा प्रयत्न जैश-ए-मोहम्मदकडून केला जात होता. मात्र, भारतीय लष्कराच्या या धाडसी कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.