इराणची ३ जहाजे भारताने केली जप्त, अमेरिकेने घातले होते निर्बंध; मुंबईपासून काहीच अंतरावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:39 IST2026-02-17T11:37:46+5:302026-02-17T11:39:50+5:30
अलीकडच्या काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच इराणी जहाजांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

इराणची ३ जहाजे भारताने केली जप्त, अमेरिकेने घातले होते निर्बंध; मुंबईपासून काहीच अंतरावर कारवाई
नवी दिल्ली - भारतानेइराणची ३ तेल जहाजे जप्त केली आहेत. या तिन्ही जहाजांवर अमेरिकेने निर्बंध लावले होते. भारताने आपल्या सागरी परिसरात सुरक्षा आणखी जास्त वाढवली आहे. अलीकडेच भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डिल झाली. त्यानंतर भारताने ही कारवाई केली आहे.
माहितीनुसार, स्टेलर रुबी, एस्फाल्ट स्टार आणि अल जफजिया ही तिन्ही जहाजे सागरी किनारी पोलिसांच्या नजरेतून वाचत कायम त्यांची ओळख बदलत राहायचे. या जहाजांचे मालक परदेशात राहतात. या प्रकरणाशी निगडित एक पोस्ट ६ फेब्रुवारीला भारतीय अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर केली होती. मात्र काही काळाने ती डिलीट करण्यात आली. आपल्या सागरी क्षेत्राचा वापर शिप टू शिप ट्रान्सफरसाठी होऊ नये यासाठी भारत सतर्क आहे. ज्याचा वापर तेल कार्गोची ओळख लपवण्यासाठी केला जातो. अशा वाहतुकीचा वापर कायम निर्बंधातून पळवाट काढण्यासाठी आणि ट्रॅकिंगला अडथळा आणण्यासाठी केला जातो.
अलीकडच्या काळात अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच इराणी जहाजांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील ५० टक्के टॅरिफमध्ये कपात करून १८ टक्के करण्याची घोषणा केली. रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद करण्यावर सहमती झाल्याचा दावा अमेरिकेने केला. भारतीय अधिकाऱ्यांनी डिलिट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, एका टँकरशी निगडित संशयास्पद हालचाली समजल्यानंतर मुंबईपासून १०० नॉटिकल मैलावर पश्चिमेकडे ३ जहाजांना रोखण्यात आले. ही जहाजे तपासण्यासाठी मुंबईच्या दिशेने आणल्याची माहिती न्यूज एजेन्सी रॉयटर्सने दिली होती.
समुद्रात जप्त करण्यात आलेल्या या जहाजांच्या जप्तीनंतर इंडियन कोस्ट गार्डने देखरेख वाढवली होती. जवळपास ५५ जहाजे आणि १० ते १२ एअरक्राफ्ट भारताच्या सागरी हद्दीत चोवीस तास लक्ष ठेवत आहेत. या कारवाईनंतर इराणनेही स्पष्टीकरण दिले. ही जहाजे आणि त्यातील सामनाशी इराणशी देणे घेणे नाही असं नॅशनल इरानियन ऑयल कंपनीने म्हटलं. ज्या तेल आणि इंधनावर बंदी आहे ते कायम खूप जास्त डिस्काऊंटवर ट्रेड केले जाते. कारण त्यात जास्त रिस्क असते. समुद्री चाचे कार्गोची ओळख लपवण्यासाठी आणि एनफोर्समेंट छाननीतून बचावासाठी लेयर्ड ऑनरशिप स्ट्रक्चर, चुकीचे पेपर आणि सागरी ट्रान्सफरवर भरवसा ठेवतात.