LPG Crisis: युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:37 IST2026-03-12T08:36:59+5:302026-03-12T08:37:38+5:30
India LPG Buffer Stock News Marathi : LPG साठा किती दिवस पुरणार? केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी कायदा केला लागू. वाचा सविस्तर.

LPG Crisis: युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत? भारताकडे किती दिवसांचा स्टॉक शिल्लक; केंद्राने उचलले मोठे पाऊल!
नवी दिल्ली: इस्रायल-अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. भारताची ६०% LPG गरज आयातीवर अवलंबून असल्याने देशात गॅसची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 'जीवनावश्यक वस्तू कायदा, १९९५' लागू करून साठेबाजीवर कडक निर्बंध आणले आहेत.
भारताला दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष मेट्रिक टन LPG ची गरज भासते. म्हणजेच दररोज सुमारे ६४ लाख सिलेंडर्सचा वापर होतो. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशातून येणारी जहाजे आणि 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' येथील तणावामुळे पुरवठा साखळीवर दबाव आला आहे.
भारताकडे किती दिवस पुरेल इतका साठा आहे?
सरकारी आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारताच्या LPG साठ्याबाबत दोन मुख्य आकडे समोर येत आहेत.
पहिला अंदाज: कंपन्यांकडे असलेला सध्याचा साठा आणि समुद्रात भारताच्या दिशेने येत असलेली जहाजे यांचा विचार करता, भारत ४० ते ४५ दिवस आपली गरज भागवू शकतो.
दुसरा अंदाज: कच्च्या तेलाचा धोरणात्मक साठा गृहीत धरल्यास, भारत सुमारे ८ आठवडे (५६ दिवस) तग धरू शकतो.
सरकारची रणनीती
परिस्थिती हाताळण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती रिफायनरींना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, घरगुती LPG उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
घाबरू नका!
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे की, घरगुती वापरासाठी LPG पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅसची साठेबाजी करू नये.