पश्चिमबंगालमध्ये निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार निशाणा साधला. "झालमुडी मी खाल्ली, मात्र मिरची टीएमसीला लागली," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर ४ मे रोजी बंगालमध्ये भाजपच्या विजयाची मिठाई आणि झालमुडी वाटली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते कृष्णानगर येथे जनसभेला संबोधित करत होते.
बंगालमध्येही कमळ फुलणार -पंतप्रधान मोदी म्हणाले, "यावेळी बंगालमध्ये विक्रमी मतदान होत आहे. जुने सर्व विक्रम मोडित निघत आहेत. देशात जेथे जेथे मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे, तेथे तेथे भाजपचा मोठा विजय झाला आहे. यामुळे बंगालमध्येही निश्चितपणे कमळ फुलणार आहे. ५० वर्षात पहिल्यांदाच बंगालमध्ये किमान हिंसाचारासह निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने येथे लोकशाहीची पुनर्स्थापना केली आहे."
"ही निवडणूक भाजप अथवा मोदी लढवत नाहीत, तर..."मोदी पुढे म्हणाले, "जनतेमध्ये टीएमसीचे मंत्री, आमदार आणि त्यांच्या सिंडिकेट विरुद्ध संतापाची लाट आहे. अनेक जिल्ह्यांत टीएमसीला खातेही उघडता येणार नाही. १५ वर्षांपूर्वी जनतेने डाव्यांविरुद्ध शंखनाद केला होता. आज तसेच चित्र तृणमूलच्या 'जंगलराज' विरुद्ध दिसत आहे. ही निवडणूक भाजप अथवा मोदी लढवत नाहीत, तर बंगालची जनता लढवत आहे."
प्रत्येक शरणार्थ्याच्या पाठिशी मोदी खंबीरपणे उभा -यावेळी टीएमसीच्या आश्वासनांचा उल्लेख करत, त्यांनी दिलेली आश्वासने अर्थवटच आहेत, असा आरोपही मोदींनी केला. तसेच, मतुआ आणि नामशूद्र समाजासह कुठल्याही शरणार्थी कुटुंबाला घाबरण्याचे कारण नाही. धर्म छळामुळे भारतात आलेल्या प्रत्येक शरणार्थ्याच्या पाठिशी मोदी खंबीरपणे उभा आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच CAA अंतर्गत नागरिकत्व देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान केली जाईल, असा आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी या शरणार्थी कुटुंबांना दिला.
Web Summary : Modi attacked TMC in West Bengal, predicting a BJP victory. He assured refugees of support and faster citizenship under CAA if BJP wins.
Web Summary : मोदी ने बंगाल में टीएमसी पर हमला बोला, बीजेपी की जीत की भविष्यवाणी की। उन्होंने शरणार्थियों को समर्थन और बीजेपी की जीत पर सीएए के तहत तेजी से नागरिकता का आश्वासन दिया।