फिटनेससाठी जिममध्ये जाणाऱ्या पत्नीचा जीव तिच्याच पतीच्या हातून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून, जिममध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पती तब्बल ७ तास पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून होता, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डबल फाटक परिसरात ही घटना घडली. शोभित गुप्ता हा स्क्रॅपचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी पूनम गुप्ता ही आरोग्याबाबत जागरूक होती आणि रोज जिममध्ये जात होती. मात्र, पूनमचे जिममध्ये जाणे शोभितला अजिबात आवडत नसे. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत असत. गुरुवारी सकाळी पूनम जिमवरून घरी परतली, तेव्हा पुन्हा एकदा या विषयावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात शोभितने शटर उघडण्याचा लोखंडी हँडल उचलला आणि पूनमच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यातच तिचा जागीच मृत्यू झाला.
७ तास मृतदेहाजवळ बसला आरोपी
पत्नीची हत्या केल्यानंतर शोभित घराबाहेर पळून गेला नाही, तर तो तब्बल ७ तास तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. दुपारी जेव्हा त्यांची लहान मुलगी शाळेतून घरी आली, तेव्हा वडिलांनी तिला काहीही कळू दिले नाही. तिला बहाण्याने दुसऱ्या खोलीत पाठवून दिले. त्यानंतर सायंकाळी स्वतःच पोलिसांना फोन करून पत्नी जखमी झाल्याची खोटी माहिती दिली, जेणेकरून हे एक अपघात असल्याचे भासवता येईल.
पोलिसांच्या चौकशीत सत्य आले समोर
डायल ११२ ची टीम घटनास्थळी पोहोचली असता त्यांना बेडवर पडलेला मृतदेह पाहून संशय आला. पोलिसांनी पती शोभितची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
आधीही दिले होते विष
दरम्यान, मृतकाचा भाऊ आणि नातेवाईकांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. ही केवळ जिमच्या वादाची घटना नसून, पूनमला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधीही तिला काचेची पावडर खाऊ घालून मारण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे तिची जीभ आणि गाल कापले गेले होते, असे भावाचे म्हणणे आहे. या घटनेत पतीसोबतच सासरच्या इतर सदस्यांचाही हात असल्याचा दावा मृतकाचे कुटुंबीय करत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In UP, a husband murdered his wife after arguments about her gym visits. He struck her with an iron rod and then stayed with the body for seven hours, later fabricating a story for police.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक पति ने जिम जाने को लेकर विवाद के बाद अपनी पत्नी की हत्या कर दी। उसने लोहे की रॉड से हमला किया और फिर सात घंटे तक शव के साथ रहा, बाद में पुलिस के लिए झूठी कहानी बनाई।