आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:34 IST2026-05-05T05:31:30+5:302026-05-05T05:34:26+5:30
आसाममधील हा विजय केवळ सत्तेची पुनरावृत्ती नाही, तर ईशान्य भारतात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे लक्षण आहे. ‘नेडा’अंतर्गत भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपुल्स फ्रंट यांची युती यशस्वी ठरली आहे, तर काँग्रेसला पुन्हा एकदा आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.

आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून ऐतिहासिक हॅटट्रिक साधली आहे. १२६ जागांच्या विधानसभेत भाजपने आकडा पार करत ८१ जागा मिळवत काँग्रेसच्या आव्हानाला धुळीस मिळवले आहे.
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
आसाममधील हा विजय केवळ सत्तेची पुनरावृत्ती नाही, तर ईशान्य भारतात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे लक्षण आहे. ‘नेडा’अंतर्गत भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपुल्स फ्रंट यांची युती यशस्वी ठरली आहे, तर काँग्रेसला पुन्हा एकदा आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सरमांवर दाखवला पुन्हा विश्वास
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या पारंपरिक आणि बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जालुकबारी मतदारसंघातून ८९,४३४ इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसने बिदिशा नियोग या ३५ वर्षीय महिला उमेदवाराला उमेदवारी दिली होती. त्यांना केवळ ३७,७१७ इतकी मते मिळाली. या विजयाने सरमा यांनी विधानसभेत सलग सहा वेळा जाण्याचा एक विक्रमही केला आहे.
गौरव गोगोई यांचा पराभव
काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले गौरव गोगोई जोरहाट मतदारसंघातून कडवी झुंज देत होते; परंतु भाजपच्या लाटेसमोर त्यांना अपेक्षित यश मिळवणे कठीण झाले. गौरव गोगोई यांचा भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी २३,१८२ इतक्या मतांनी पराभव केला. २०२१ मध्येही गोगोई यांना गोस्वामी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
‘काँग्रेसला मतपेटीतून शिक्षा’
हा विजय म्हणजे गेल्या पाच वर्षांतील सकारात्मक कामाचे प्रतिबिंब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या विकासासाठी दिलेल्या ताकदीचा विजय आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी जनतेचे आभार मानले. हा विजय केवळ राजकीय नसून तो राज्यातील विकास आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर मिळालेला कौल आहे. काँग्रेसला जनतेतून पुन्हा मतपेटीतून शिक्षा दिली अशी टीका त्यांनी केली.
विजयाची मुख्य कारणे
भाजपने दिलेल्या ‘संकल्पपत्रा’तील आश्वासने, जसे की समान नागरी कायदा लागू करणे, घुसखोरी रोखणे आणि ‘ओरुनोदोई योजने’द्वारे महिलांना केलेली आर्थिक मदत, भाजपच्या विजयात निर्णायक ठरली.
ज्वलंत मुद्दे : एनआरसी, सीएए, बांगलादेशी घुसखोरीवरची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली. २०२३ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा फायदाही सत्ताधारी आघाडीला मिळाला.
आर्थिक विकास : राज्याचा विकासदर ७.४१ लाख कोटींपर्यंत नेण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि ५ लाख कोटींच्या नवीन गुंतवणुकीचा रोडमॅप मतदारांना भावला.
महिला मतदारांची साथ : ‘ओरुनोदोई योजने’अंतर्गत दरमहा ३,००० रुपये आणि ४० लाख महिलांना २५ हजार रुपयांची मदत या योजनांचा भाजपला फायदा.