'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:28 IST2026-05-05T05:27:10+5:302026-05-05T05:28:22+5:30
राज्यातील प्रत्येक मतदारसंघ हा संवेदनशील होता. बंगालमध्ये निवडणूक म्हटले की, हिंसाचार आणि मतदान केंद्रांवर गोंधळ ठरलेला असायचा; परंतु यंदा निवडणूक आयोग, विविध सुरक्षा दले आणि प्रशासनाने परंपरेला छेद देत राज्यातील राजकारणाला नवी दिशा दिली.

'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
कोलकाता/नवी दिल्ली : प. बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली.
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
एकेकाळी डाव्या पक्षांचा गड, आता ममता बॅनर्जींच्या एकहाती नेतृत्वाखालील तृणमूलचा बालेकिल्ला भाजपने घुसखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांआधारे सर केला. राज्यात ९१ लाख बोगस मतदारांची नावे वगळणाऱ्या मतदारयाद्या सखोल पुनरिक्षणाच्या मोहिमेने अर्थात ‘एसआयआर’ने नकळत भाजपच्या अजेंड्याला आधार मिळाला. यातून बऱ्याच अंशी अल्पसंख्याक आणि इतर असे मतांचे झालेले विकेंद्रीकरण भाजपच्या पथ्यावर पडले.
बंगालमधील निवडणुकीला नवी दिशा
राज्यातील प्रत्येक मतदारसंघ हा संवेदनशील होता. बंगालमध्ये निवडणूक म्हटले की, हिंसाचार आणि मतदान केंद्रांवर गोंधळ ठरलेला असायचा; परंतु यंदा निवडणूक आयोग, विविध सुरक्षा दले आणि प्रशासनाने परंपरेला छेद देत राज्यातील राजकारणाला नवी दिशा दिली.
२०हून अधिक मंत्र्यांना धक्का
मतदारांनी २०हून अधिक मंत्र्यांना पराभवाचा धक्का दिला. यात शिक्षणमंत्री ब्रत्य बासू, जलसिंचन मंत्री रंजन भुईयां, महिला-बालकल्याण मंत्री शशी पांजा, अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य, परिवहन मंत्री स्नेहाशीष चक्रवर्ती अशा प्रतिष्ठित मंत्र्यांचा समावेश आहे.
काँग्रेस-डाव्यांचा उडाला धुव्वा
बंगालमध्ये निर्माण झालेल्या प्रबळ ‘भगव्या लाटे’समोर डावी आघाडी आणि काँग्रेस या पक्षांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. २०२१ च्या निवडणुकीत भोपळाही न फोडता आलेल्या या पक्षांना यंदाही मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे.
काँग्रेसची दोन जागांवर धडपड : काँग्रेसने यंदा बंगालमधील सर्व २९४ जागांवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधी यांनी मालदा, मुर्शिदाबादमध्ये सभा घेऊनही काँग्रेस केवळ रानीनगर आणि फरक्का या दोनच जागांवर आघाडीवर होती. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे स्वतः बहरामपूर मतदारसंघातून ७,५०० मतांनी पिछाडीवर होते.
डाव्यांची स्थिती : ‘बांग्ला बचाओ’ यात्रा काढून भ्रष्टाचाराविरोधात रान उठविणाऱ्या माकपाची अवस्थाही वाईट आहे. पक्षाचे दिग्गज नेते विकास रंजन भट्टाचार्य, मीनाक्षी मुखर्जी आणि दिप्सिता धर हे आपापल्या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. केवळ डोमकल मतदारसंघातून माकपाचे मोहम्मद मुस्तफिजुर रहमान हे आघाडीवर होते.
मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचा परिणाम : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या वक्फ कायदा विरोधी आंदोलनादरम्यानच्या जातीय हिंसाचाराचा परिणाम मतदानावर स्पष्टपणे जाणवला.
रणनीतीत बदल : भाजपने पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून स्थानिक पातळीवर पकड असलेल्यांना संधी दिली. तसेच ममतांवर वैयक्तिक टीका टाळून, सरकारी यंत्रणेतील त्रुटी व भ्रष्टाचारावर अधिक लक्ष केंद्रित केले.