नोएडातील उद्रेकानंतर सरकार नरमले; कामगारांच्या पगारात हजारोंची वाढ, योगी आदित्यनाथ यांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:27 IST2026-04-15T07:25:39+5:302026-04-15T07:27:58+5:30

Noida Outbreak: नोएडातील कामगारांच्या उग्र आंदोलनाची दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Government softens after Noida outbreak; Workers' salaries increase by thousands | नोएडातील उद्रेकानंतर सरकार नरमले; कामगारांच्या पगारात हजारोंची वाढ, योगी आदित्यनाथ यांनी दिली मंजुरी

नोएडातील उद्रेकानंतर सरकार नरमले; कामगारांच्या पगारात हजारोंची वाढ, योगी आदित्यनाथ यांनी दिली मंजुरी

नोएडा - नोएडातील कामगारांच्या उग्र आंदोलनाची दखल घेत उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली असून, वाढीव वेतनाचे हे दर १ एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहेत.

गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चाधिकार समितीच्या शिफारसींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार श्रेणीनिहाय वेतनाचे दर खालीलप्रमाणे असतील:

गौतम बुद्ध नगर व गाझियाबाद : अकुशल कामगारांना ११,३१३ ऐवजी १३,६९० रुपये मिळतील. अर्ध-कुशल कामगारांना १५,०५९ तर कुशल कामगारांना १६,८६८ वेतन मिळेल.

इतर महानगरपालिका क्षेत्र: अकुशल कामगारांसाठी १३,००६ रुपये, अर्ध-कुशलसाठी १४,३०६ रुपये आणि कुशल कामगारांसाठी १६,०२५ रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे.

उर्वरित जिल्हे : अकुशल कामगारांना १२,३५६ रुपये, अर्ध-कुशल कामगारांना १३,५९१ रुपये आणि कुशल कामगारांना १५,२२४ रुपये मिळतील.
सोशल मीडियावर कामगारांचे किमान वेतन सरसकट २०,००० रुपये केल्याच्या बातम्या फिरत होत्या, मात्र सरकारने या बातम्यांचे खंडन केले आहे.  

३०० जणांना अटक 
नोएडातील कामगारांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी गौतम बुद्ध नगरच्या पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी मोठी कारवाई जाहीर केली आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ३०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवारी पहाटे ५ वाजेपासूनच विविध भागात रूट मार्च काढण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांत व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि क्यूआर कोडचा वापर करून कामगारांना एकत्र केले, असे पोलिसांनी सांगितले. 

‘...पण सरकारने त्यांना ओझे समजले आहे’ 
नोएडातील कामगारांच्या हिंसक आंदोलनावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “मजूर हे देशाचा कणा आहेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांना ओझे समजले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी म्हटले की, नोएडाच्या रस्त्यांवर सोमवारी जे झाले, ती देशातील कामगारांची शेवटची आरोळी होती. बेलगाम महागाई सर्वसामान्यांचा गळा घोटत असून हेच ‘विकसित भारताचे’ खरे वास्तव आहे, असा टोला त्यांनी लगावला.

या वर्षी १२ राज्यांत वाढले किमान वेतन
देशातील कामगारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २०२६ या वर्षात भारतातील प्रमुख १२ राज्यांनी आपल्या किमान वेतनात वाढ केली आहे. यामध्ये उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतच्या राज्यांचा समावेश आहे. या मध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कामगारांचे वेतन   
महाराष्ट्र सरकारने विविध श्रेणींनुसार किमान वेतनात वाढ केली असून, झोन १ मध्ये कुशल कामगारांना १५,५३२ रुपये, अर्ध-कुशल कामगारांना १४,७५६ रुपये व अकुशल कामगारांना १३,९२१ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. झोन २ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे १४,९३६ रुपये, १४,१६० रुपये आणि १३,३२५ रुपये इतके आहे, तर झोन ३ मधील कुशल कामगारांना १४,३४० रुपये, अर्ध-कुशल कामगारांना १३,५६४ रुपये महिना मिळणार आहे. 

Web Title : नोएडा अशांति: सरकार नरम, योगी की मंजूरी से श्रमिकों के वेतन में वृद्धि

Web Summary : नोएडा में श्रमिकों के विरोध के बाद, उत्तर प्रदेश ने अप्रैल 2026 से प्रभावी न्यूनतम मजदूरी बढ़ाई। गौतम बुद्ध नगर और गाजियाबाद में अकुशल श्रमिक अब ₹13,690 कमाएंगे। हिंसक विरोध के बाद 300 से अधिक गिरफ्तार।

Web Title : Noida unrest: Government softens, worker salaries hiked with Yogi's approval.

Web Summary : Following Noida worker protests, Uttar Pradesh increased minimum wages, effective April 2026. Unskilled workers in Gautam Buddh Nagar & Ghaziabad will now earn ₹13,690. Over 300 arrested after the violent protests.