६० व्या वर्षी पडले प्रेमात नंतर लग्न? कुटुंब, आईचा विरोध, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची लव्हस्टोरी चर्चेत...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:51 IST2026-03-17T14:48:44+5:302026-03-17T14:51:08+5:30

Manvendra Singh Relationship: वाजपेयी सरकारच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांची प्रेमकहाणी सध्या राजस्थानमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Fell in love at 60, later got married, mother opposed, senior BJP leader Manvendra Singh's love story in discussion... | ६० व्या वर्षी पडले प्रेमात नंतर लग्न? कुटुंब, आईचा विरोध, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची लव्हस्टोरी चर्चेत...  

६० व्या वर्षी पडले प्रेमात नंतर लग्न? कुटुंब, आईचा विरोध, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची लव्हस्टोरी चर्चेत...  

वाजपेयी सरकारच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांची प्रेमकहाणी सध्या राजस्थानमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार असलेल्या ६० वर्षीय मानवेंद्र सिंह यांचं नाव नीरजा सिंह चारण यांच्याशी जोडण्यात आलं असून, कुटुंब आणि परंपरांना धक्का देणाऱ्या या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे.

नीरजा सिंह चारण यांचं वय ३७ वर्षे असून, त्या राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील खीनामडी गावातील रहिवासी आहे. त्या एका लक्झरी कार कंपनीच्या शोरूममध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत होत्या. दरम्यान मानवेंद्र सिंह आणि नीरजा यांची पहिली भेट कार सर्व्हिसिंगदरम्यान झाली होती. पुढे या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि हळुहळू प्रेमात झालं. पहिली पत्नी चित्रा सिंह यांच्या निधनानंतर मानवेंद्र सिंह हे मानसिकदृष्ट्या खचले होते. अशा परिस्थितीत नीरजा त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांना आधार दिला, असे सांगण्यात येत आहे.

या नात्याला अधिकृतरीत्या दुजोरा मिळालेला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो आणि चर्चांमुळे हे प्रेमप्रकरण चर्चेत आले आहे. यातील एका फोटोमध्ये मानवेंद्र सिंह आणि नीरजा ह्यांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातलेल्या दिसत आहेत. तसेच एका मित्राने इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्याने दोघांचं लग्न झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मानवेंद्र सिंह यांच्या आई शीतल कंवर यांनी या नात्याला स्पष्टपणे विरोध केला आहे. कौटुंबिक परंपरांच्या संरक्षक मानल्या जाणाऱ्या शीतल कंवर यांनी आपण या नात्याचा कोणत्याही परिस्थितीत स्वीकार करणार नसल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी मानवेंद्र सिंह यांचे पुत्र हमीर सिंह यांनीही एक नोटिस प्रसिद्ध केली आहे. तसेच कुटुंबाने त्यांच्या कुठल्याही बाहेरील महिलेसोबतच्या संबंधांना मान्यता देण्यास नकार दिला आहे, असे या नोटिसीमधून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या नात्यामुळे काही सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. राजपूत समाजामध्ये चारण समुदायातील महिलांना पारंपरिकरीत्या बहीण आणि मुलीच्या रूपात सन्मान दिला जातो. अशा परिस्थितीत या नात्याच्या चर्चेने सामाजातील एक वर्ग नाराज झाला आहे. असं असतानाही मानवेंद्र सिंह हे सध्यातरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, या सर्व प्रकरणावर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

Web Title: Fell in love at 60, later got married, mother opposed, senior BJP leader Manvendra Singh's love story in discussion...