‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:37 IST2026-05-07T10:36:25+5:302026-05-07T10:37:14+5:30
West Bengal Assembly Election 2026 Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पश्चिम बंगालमधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्याचदरम्यान, बांगलादेशमधील नेते मोहम्मद नुरुल हुदा यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत एक चिथावणीखोर विधान केलं आहे.

‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. तर भाजपाने स्पष्ट बहुमतासह पहिल्यांदाच राज्यातील सत्ता मिळवली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निकालांवरून निवडणूक आयोग आणि भाजपावर आगपाखड केली होती. तसेच माझा पराभव झालेला नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेनंतर पश्चिम बंगालमधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. त्याचदरम्यान, बांगलादेशमधील नेते मोहम्मद नुरुल हुदा यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत एक चिथावणीखोर विधान केलं आहे.
बांगलादेशी नेता मोहम्मद नुरूल हुदा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याला भारतापासून स्वतंत्र घोषित करावे आणि दिल्लीविरोधात युद्धाची घोषणा करावी. त्यांना १७० कोटी बांगलादेशी मुस्लिम साथ देतील, अशी चिथावणीही मोहम्मद नुरूल हुदा यांनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेत पराभवाचं खापर निवडणूक आयोगावर फोडलं होतं. तसेच मी पराभूत झालेले नाही. त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. त्याबरोबरच या निवडणुकीत भाजपाने १०० जागांची चोरी केली, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला होता.