खेळता खेळता ५ वर्षीय मुलाच्या अंगावर पडला लोखंडी गेट; काळजाचा थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:52 IST2026-05-11T11:51:07+5:302026-05-11T11:52:04+5:30
Video - उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे, जिथे खेळता-खेळता एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.

खेळता खेळता ५ वर्षीय मुलाच्या अंगावर पडला लोखंडी गेट; काळजाचा थरकाप उडवणारा Video
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे, जिथे खेळता-खेळता एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना फेज-२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेझा गावात घडली. घराबाहेर लावलेला जड लोखंडी गेट अंगावर पडल्याने या मुलाचा मृत्यू झाला. या अपघाताचं संपूर्ण दृश्य जवळच बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेझा गावचे रहिवासी मनीष कुमार यांचा पाच वर्षांचा मुलगा नवदीप शनिवारी सकाळी ९:२० च्या सुमारास घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो शेजारी लावलेल्या एका मोठ्या लोखंडी गेटवर लोंबकळू लागला. काही सेकंदातच अचानक गेट थेट मुलाच्या अंगावर कोसळला. जड गेटखाली दबला गेल्याने नवदीप गंभीर जखमी झाला.
नोएडा के गेझा गांव में दर्दनाक हादसा, पांच वर्षीय मासूम लोहे के गेट पर चढ़कर खेल रहा था। इसी दौरान अचानक गेट टूटकर उसके ऊपर गिर गया। लोहे के भारी गेट के नीचे दबने से मासूम की मौत। pic.twitter.com/acRUO1HpiQ
— Siddharth Agarwal 🇮🇳 (@siddharth2596) May 10, 2026
कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर
मोठा आवाज ऐकून आसपासचे लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले. लोकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर तो लोखंडी गेट बाजूला केला आणि मुलाला बाहेर काढलं. कुटुंबीय त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची तयारी करत होते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चिमुकल्याने जीव गमावला होता. मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
गेट बराच जुना झाला होता
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेट बराच जुना झाला होता. गेटच्या स्थितीबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली होती, मात्र वेळेवर दुरुस्ती करण्यात आली नाही. जर गेट मजबूत असता, तर कदाचित ही दुर्घटना टळली असती असं लोकांचं मत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच फेज-२ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नवदीप घराबाहेर गेटवर खेळत असताना अचानक गेट त्याच्या अंगावर पडला. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सध्या पोलीस आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहेत.