बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:40 IST2025-10-06T13:38:40+5:302025-10-06T13:40:21+5:30
Bihar Assembly Election 2025: विशेष म्हणजे, या वेळच्या लढतीत प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षही उतरला आहे. यामुळे निवडणुकीचा हा अखाड आणखीनच रंगतदार होणार आहे...

बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबरकसून कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा आज (6 ऑक्टोबर) होणार असून त्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. विविध सर्वेक्षणांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन यांच्यात काट्याची टक्कर दिसत आहे. विशेष म्हणजे, या वेळच्या लढतीत प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षही उतरला आहे. यामुळे निवडणुकीचा हा अखाड आणखीनच रंगतदार होणार आहे.
गेल्या 2020 च्या निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या ओपिनियन पोलमध्ये, महागठबंधनला आघाडी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काहिनी अटीतटीची स्थिती दर्शवली होती. ‘लोकनीति-सीएसडीएस’च्या सर्व्हेनुसार एनडीएला 38, महागठबंधनला 32, उपेंद्र कुशवाहा गटाला 7, चिराग पासवान यांच्या एलजेपीला 6 आणि इतरांना 17 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. मात्र प्रत्यक्षात एनडीएला सत्ता मिळाली.
या वेळी चार ओपिनियन पोलच्या सरासरी आकडेवारीनुसार, एनडीएला 40 ते 52 टक्के मते आणि 130 ते 158 जागा मिळू शकतात. तर महागठबंधनला 37 ते 41 टक्के मते आणि 80 ते 103 जागांची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’लाही 10 ते 11 टक्के मते आणि 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार हेच जनतेची पहिली पसंती असल्याचे दिसत आहे. 27 टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तेजस्वी यादव आहेत.
2020 च्या निवडणूक निकालाचा विचार करता, राजदला 75, भाजपला 74, जेडीयूला 43, काँग्रेसला 19 आणि सीपीआय(एमएल)ला 12 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय, असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला 5, जीतन राम मांझी यांना 4, मुकेश सहनी यांच्या व्हीआयपीला 4, सीपीआयला 2, सीपीआयएमला 2, मायावतीच्या बीएसपीला 1, एलजेपीला 1 जागा मिळाल्या होत्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडणून आला होता. यातच, आता बिहारची सत्ता कुणाला मिळते? हे येणारा काळच ठरवेल.