Bhagwant Mann : "अरविंद केजरीवाल आणि 'आप'विरोधात भाजपाचा कट उघड"; मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:09 IST2026-03-02T09:09:03+5:302026-03-02T09:09:53+5:30
Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Bhagwant Mann : "अरविंद केजरीवाल आणि 'आप'विरोधात भाजपाचा कट उघड"; मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हल्लाबोल
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रविवारी जंतर-मंतर येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, भारतातील हुकूमशाही राजकारण बदलण्यासाठी पंजाब आम आदमी पार्टीच्या (आप) सोबत खंबीरपणे उभा आहे. २०२७ मध्ये पंजाबची जनता 'आप'ला १०० जागांचं मोठं गिफ्ट देईल. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह संपूर्ण आम आदमी पार्टी भक्कम उभी राहून देशाची लढाई लढत आहे.
भगवंत मान पुढे म्हणाले की, भाजपाने एका कटातर्गत 'आप'ला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता तो कट देशासमोर उघड झाला आहे. मोदी सरकार हे पंजाब विरोधी असल्याचं सांगत त्यांनी आरोप केला की, आरडीएफ (RDF) आणि जीएसटीसह पंजाबच्या हक्काचे कोट्यवधी रुपये केंद्र सरकार रोखत आहे. आम्ही देशातील द्वेष आणि खोटेपणाचं राजकारण संपवण्यासाठी आलो आहोत आणि त्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहोत.
"अरविंद केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांना द्वेष आणि धर्माच्या गोष्टी करण्याऐवजी त्यांच्या जाहीरनाम्यात शाळा, रुग्णालय, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांबद्दल बोलण्यास भाग पाडले आहे. खासगी रुग्णालयांचा धंदा ठप झाल्याच्या तक्रारीमुळे सत्येंद्र जैन यांना, तर खासगी शाळांच्या तक्रारींमुळे मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये टाकण्यात आलं."
"जेव्हा भाजपाला समजलं की मोफत सुविधांमुळे निवडणुका जिंकणं कठीण आहे, तेव्हा खोट्या प्रकरणात अडकवून संपूर्ण टीमलाच आत टाकलं. जेव्हा मी जेलमध्ये केजरीवाल यांना भेटायला जायचो, तेव्हा ते फक्त पंजाबच्या लोकांच्या कल्याणाबद्दल विचारायचे. लोकांना मोफत वीज मिळतेय का, शेतीसाठी पाणी मिळतेय का, असे त्यांचे प्रश्न असत. तसेच, भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजिबात सोडू नका असे त्यांचे स्पष्ट निर्देश असायचे" असं देखील भगवंत मान यांनी म्हटलं आहे.