आपचा वाद आता राष्ट्रपती दरबारी; मान, चड्ढांनी वाचला तक्रारींचा पाढा, राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:33 IST2026-05-06T09:32:54+5:302026-05-06T09:33:35+5:30
भाजपमध्ये गेलेल्या खासदारांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

आपचा वाद आता राष्ट्रपती दरबारी; मान, चड्ढांनी वाचला तक्रारींचा पाढा, राजकीय वातावरण तापले
चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आम आदमी पक्षात खदखदत असलेला अंतर्गत वाद मंगळवारी राष्ट्रपती भवनपर्यंत पोहचला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि भाजपत सामील झालेल्या आपच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची वेगवेगळी भेट घेतली आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. दोन्ही गटांच्या भेटीनंतर राजकीय वातावरण तापले आहे.
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
ऑपरेशन लोटस अपयशी : मान
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर केंद्र सरकार आणि भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले की, देशात लोकशाहीची हत्या होत आहे आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना कमकुवत केले जात आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून पंजाबमधील आपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. पण, ते कधीही यशस्वी होणार नाहीत. आपचे आमदार लाखो पंजाबी लोकांचा आवाज आहेत आणि पंजाब विश्वासघात सहन करत नाही, असे मान म्हणाले. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही पक्ष हुकूमशाही शक्तींविरुद्ध पूर्णपणे एकजूट असल्याचे म्हटले.
चड्ढांनी केला सुडाच्या राजकारणाचा आरोप
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राघव चढ्ढा यांनी पंजाब सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, पंजाबमधील ‘आप’ सरकार काही खासदारांविरुद्ध जीवघेण्या सुडाचे राजकारण करीत आहे. यासाठी सरकारी यंत्रणेचा बेकायदा वापर केला जात आहे, असे सांगत त्यांनी मान सरकारच्या कारवायांचा पाढा वाचला.
भाजपमध्ये गेलेल्या खासदारांचा आपकडून छळ
राघव चड्ढा यांनी इतर तीन खासदारांसह मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि आप सोडल्यानंतर आमचा छळ सुरू असून राजकीय हेतूने या कारवाया होत असल्याचा आरोप करणारे निवेदन सादर केले. राज्यसभा खासदार राजिंदर गुप्ता आणि अशोक मित्तल हे या शिष्टमंडळाचा भाग होते. माजी आप खासदारांना सरकारी यंत्रणांकडून धमक्या व दबावाचा सामना करावा लागत आहे.
भाजपमध्ये गेलेल्यांपैकी ६ राज्यसभा खासदारांचे सदस्यत्व रद्द करा : मान
चंडीगड : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आपच्या सात राज्यसभा खासदारांपैकी सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची तसेच सदस्यांना परत बोलावण्याची (रिकॉल) घटनात्मक तरतूद करण्याचीही मागणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंगळवारी केली. आपचे पंजाबमधील आमदार व मंत्र्यांसह मान यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात जाऊन मुर्मू यांच्याकडे निवेदन दिले.
२४ एप्रिल रोजी आपच्या १० पैकी सात जणांनी त्या पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. या सातपैकी सहा खासदार पंजाबमधील आहेत. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर भगवंत मान यांनी पत्रकारांना सांगितले की, आपच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून संविधानाची हत्या केली आहे. मी राष्ट्रपतींशी याबाबत मंगळवारी सविस्तर चर्चा केली. भाजपकडे पंजाबमध्ये फक्त दोन आमदार आहेत, तरीही आता राज्यसभेत त्यांचे सहा खासदार आहेत. हे कसे शक्य आहे? ही संविधानाची थट्टा नाही का? असा प्रश्नही मी राष्ट्रपतींशी झालेल्या चर्चेत उपस्थित केला.