नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 10:19 IST2026-04-15T10:08:23+5:302026-04-15T10:19:54+5:30
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात मलेशिया कनेक्शन समोर आलं आहे.

नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाला आता मानवी तस्करी आणि सक्तीच्या धर्मांतराचे गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, एकूण ९ गुन्हे दाखल झाले आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणींना चक्क मलेशियात विकण्याचा कट रचला जात होता.
मैत्रीच्या नावाखाली जाळं आणि मलेशिया कनेक्शन
२०२२ पासून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये तरुणींना नोकरी, प्रेम आणि मदतीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात होते. एसआयटीच्या तपासात समोर आले की, आरोपी पीडित तरुणींना मलेशियात पाठवण्याच्या तयारीत होते. यासाठी व्हिडिओ कॉलवरून चर्चा झाली होती आणि एका पीडितेच्या पासपोर्टची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात बाहेरुन आर्थिक पुरवठा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कोण आहे मास्टरमाइंड निदा खान?
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान हिचे नाव समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असलेली निदा, कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची सदस्य होती. मात्र, पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून तिने आरोपींना साथ दिल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेले निदा खानचे गंभीर कारनामे
निदा खान पीडित तरुणींवर नमाज पठण, विशिष्ट पेहराव आणि गोमांस खाण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. आरोपी टीम लीडर्समध्ये ती डेअरडेव्हिल म्हणून ओळखली जायची. पीडित तरुणी तिच्या दहशतीखाली होत्या. एका गुप्त व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कोणाला कसे जाळ्यात ओढायचे, याचे नियोजन निदा आणि तौसिफ अत्तर करायचे. या ग्रुपमधील अनेक चॅट्स डिलीट करण्यात आले असून फॉरेन्सिक टीम ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलिसांचे अंडरकव्हर ऑपरेशन
या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने तपास केला. सात महिला पोलीस कर्मचारी साफसफाई कर्मचारी बनून कंपनीत कामाला लागल्या. त्यांनी सलग काही दिवस कंपनीच्या आत राहून आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवली. यामुळेच महिलांशी होणारा गैरप्रकार आणि धर्मांतराचा दबाव पुराव्यासह समोर आला.
कठोर कारवाई आणि तपास
पीडित तरुणींच्या जबाबानुसार, त्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि धार्मिकदृष्ट्याही छळले जात होते. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंपनीने आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, पोलीस आता त्यांच्या बँक खात्यांमधील व्यवहारांची आणि विदेशी संपर्कांची कसून चौकशी करत आहेत. सध्या मुख्य आरोपी निदा खान फरार असून पोलीस तिचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत आहेत. या प्रकरणातील पीडितांची संख्या १२ वरून अजून वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.