मोदींचे आदेश मोडून घराणेशाहीचा आग्रह!

By Admin | Updated: January 12, 2017 00:53 IST2017-01-12T00:53:29+5:302017-01-12T00:53:43+5:30

भाजपाचे असेही कर्तव्यपालन : वारसांना प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न

Dismissed by the order of Moderate! | मोदींचे आदेश मोडून घराणेशाहीचा आग्रह!

मोदींचे आदेश मोडून घराणेशाहीचा आग्रह!

नाशिक : आपल्या नातलगांसाठी तिकिटे मागू नका तर कार्यकर्त्यांसाठी मागा, असे पक्षातील प्रस्थापितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन झिडकारून नाशिक भाजपामध्ये प्रमुख नेते आणि आमदार आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीसाठी मैदानात उतरले असून, आता कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की नेत्यांच्या कुटुंबीयांना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकांना वर्ष बाकी असतानाच अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांसमोर प्रोजेक्ट करणे सुरू केले आहे. त्यात अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपा अग्रेसर आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपाने स्बळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिल्यानंतर पक्षाला उमेदवारांची वानवा भासत होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात तर मागेल त्याला उमेदवारी या तत्त्वावर रिक्त जागा भरण्यात आल्या. परंतु त्यानंतर केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाकडे निवडणुकीतील डार्क हॉर्स म्हणून बघितले जात आहे. भाजपाला अनुकूल वातावरण झाल्यानंतर आता सामान्य कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने बघत आहेत. त्यातच आयारामही वाढले आहेत, अशा स्थितीत पक्षाचे प्रमुख नेते आणि लोकप्रतिनिधी तसेच आजी, माजी पदाधिकारी आपल्या कुटुंबातील सदस्यांना पुढे रेटत आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मंदार (मच्छिंद्र) सानप, आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी आणि दीर योगेश (मुन्ना) हिरे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे चिरंजीव प्रथमेश, माजी जिल्हाध्यक्ष व स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांची कन्या गौरी आडके, तर भाजपात आलेले नगरसेवक दिनकर पाटील हे त्यांची पत्नी लता तसेच पुत्र अमोल असे सहकुटुंब सहपरिवार उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. नगरसेवक सुनील आडके, सुनील खोडे यांच्यासह अनेक आजी, माजी नगरसेवक प्रभाग आरक्षित झाल्याने पत्नी, मुलगा, मुलीसाठी आग्रही असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Dismissed by the order of Moderate!