हलव्याच्या दागिन्यांनी सजली बाजारपेठ

By Admin | Updated: January 12, 2017 00:44 IST2017-01-12T00:44:06+5:302017-01-12T00:44:32+5:30

मकरसंक्रांती : परंपरेचा आधुनिकतेशी मेळ घालत करण्यात आली कलाकुसर

Brick market jewelery market | हलव्याच्या दागिन्यांनी सजली बाजारपेठ

हलव्याच्या दागिन्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक : मकरसंक्रांती म्हटल्यावर जसे तिळगूळ, पतंग, काळी साडी अशा गोष्टी डोळ्यासमोर येतात, तसेच हलव्याच्या दागिन्यांनाही महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या मुलीला-जावयाला हलव्याच्या दागिन्यांनी सजवावे, तिळगूळ द्यावा व भरभरून आशीर्वाद द्यावा, अशी आपल्याकडे परंपरा आहे. या परंपरेचा आधुनिकतेशी मेळ घालीत वैविध्यपूर्ण हलव्याचे दागिने सध्या बाजारपेठेत दाखल झाले असून, पारंपरिक हार, कानातले, नारळ याबरोबरच बानूची नथ, बानूची क्लिप, बानूचा तन्मणी, स्मार्टफोन, जिओ कार्ड यांच्या हलव्यापासून तयार केलेल्या प्रतिकृतींना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विकतचे दागिने घेण्याबरोबरच आपल्या लाडक्या लेकी, सुनांसाठी स्वत:च्या हाताने दागिने बनवण्याची लगबगही अनेकींच्या घरी दिसून येत आहे. त्यासाठी मात्र महिन्याभरापासून तयारी सुरू होती. आता त्या दागिन्यांवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे.  तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात हलव्याचे दागिने खरेदी करण्यात आले असून, दागिन्यांच्या किमतीत बदल झालेला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. महिलांचे दागिने १० वस्तूंचा सेट ६५० रुपये, लहान मुलांचा सेट २३१ रुपये, पुरुषांचा सेट ४०० रुपये असे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.

Web Title: Brick market jewelery market