लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसह नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांमध्येही निराशा पसरली असून, संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता व चांगले गुण मिळण्याचा विश्वासही होता.
'अॅन्सर की' मिळाल्यानंतर हा विश्वास वाढला होता. एकतर अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आणि पुन्हा तयारी करावी लागण्याचा मानसिक ताण व संताप विद्यार्थ्यांसह पालकांमध्येसुद्धा आहे. नागपुरात १५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी 'नीट' दिली होती.
विद्यार्थ्यांनी दिवसरात्र कष्ट घेऊन परीक्षा दिली होती. मात्र, आता पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे मानसिक तणाव वाढला आहे. सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे अभ्यासाची लय बिघडत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी नागपूरशी जुळले होते तार
३ मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर अनेक राज्यांतून पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सध्या नाशिकमध्ये गैरप्रकाराचे केंद्र ग्राह्य धरले जात असले तरी गडचिरोलीमधूनही पेपर लिक झाल्याची माहिती पुढे आली होती. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीसुद्धा नीटचा पेपर फुटला होता व त्याचे तार नागपूरशी जुळले होते. यंदासुद्धा ही शक्यता तपासली जाण्याची शक्यता आहे
"परीक्षा रद्द व्हायला नको होती. दोन वर्षे सातत्याने मेहनत करून परीक्षा दिली होती. पेपरही चांगला गेला होता. आता पुन्हा परीक्षा देण्यासाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे. दरवर्षी पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. केवळ परीक्षार्थ्यांवर कडक नियम लादून सुधारणा होणार नाही."
- सारिणी इकरे, नीट परीक्षार्थी
"२०२४ मध्येही पेपरफुटी झाली होती. मात्र, त्यावेळी परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती. यावेळी परीक्षा रद्द करण्यापूर्वी एनटीएने संपूर्ण प्रकरण स्पष्ट करायला हवे होते. या पेपरफुटीतून नेमक्या किती विद्यार्थ्यांना फायदा झाला, हेही जाहीर करणे आवश्यक होते. जर काही मोजकेच विद्यार्थी लाभार्थी असतील, तर सर्व विद्यार्थ्यांना त्रास देण्याची गरज काय ?"
- डॉ. समीर फाले, वैद्यकीय परीक्षा मार्गदर्शक
"परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे मानसिक तणाव वाढणार आहे. काही ठिकाणी पेपरफुटी होत असेल तर त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. परीक्षा दिल्यानंतर निकालाची प्रतीक्षा होती; पण अचानक परिस्थिती बदलली. आता पुन्हा अभ्यासाला लागावे लागणार आहे."
- अर्चेश वाघमारे, नीट परीक्षार्थी
Web Summary : NEET-UG exam cancellation sparks outrage among students in Nagpur and Vidarbha. Students face mental stress and disrupted study schedules due to alleged paper leaks and re-exam decision. Students demand strict action against culprits.
Web Summary : नीट-यूजी परीक्षा रद्द होने से नागपुर और विदर्भ के छात्रों में आक्रोश है। कथित पेपर लीक और पुन: परीक्षा के कारण छात्र मानसिक तनाव और बाधित अध्ययन कार्यक्रम का सामना कर रहे हैं। छात्रों ने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की।