सीबीएसई बारावीत नागपूरचे विद्यार्थी चमकले; मृण्मयी मेश्राम, अथर्व लाहाेटी, विधी तिवारी ठरले टाॅपर
By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2026 20:39 IST2026-05-13T20:38:37+5:302026-05-13T20:39:33+5:30
Nagpur : सीबीएसई बाेर्डाच्या बारावी परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. या परीक्षेत तिन्ही शाखांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

Nagpur students shine in CBSE Class 12th; Mrinmayi Meshram, Atharva Lahoti, Vidhi Tiwari emerge toppers
नागपूर : सीबीएसई बाेर्डाच्या बारावी परीक्षेचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. या परीक्षेत तिन्ही शाखांमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. अनेक शाळांनी सेंट पर्सेंट निकाल दिला आहे. यामध्ये विज्ञान शाखेत ९७ टक्के गुणांसह मृण्मयी मेश्राम, वाणिज्य शाखेत ९८.४ टक्के गुणांसह अथर्व लाहाेटी आणि मानव्यशास्त्रात ९७.४ टक्के गुणांसह विधी तिवारी यांनी संभाव्य टाॅपरची रॅंक प्राप्त केली आहे.
सीबीएसई बाेर्डाच्या २२ विद्यालयांमधून यंदा ८ ते १० हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी यशस्वी भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये निकालामुळे उत्साह हाेता, मात्र येत्या काही दिवसात जेईई अॅडव्हान्स, पुन्हा हाेणारी नीट, तसेच एमएचसीईटी व इतर महत्त्वाच्या परीक्षा हाेणार आहेत व त्याच्या तयारीत असलेले विद्यार्थी विद्यालयात पाेहचले नाही, ज्यामुळे बहुतेक विद्यालयांमध्ये शुकशुकाट हाेता.
या निकालांमध्येही मुलींच्या यशाचा टक्का अधिक असल्याचे दिसून येत आहे. विज्ञान शाखेत सेंट पाॅल शाळेची मृण्मयी मेश्राम या विद्यार्थिनीने ९७ टक्के गुण घेतले आहेत. याशिवाय सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगर येथील हिती अग्रवाल या विद्यार्थिनीला देखील ९७ टक्के गुण मिळाले आहेत. याशिवाय सेंट पाॅल शाळेची कलश पाटीलला ९६.८० टक्के आणि श्रीनिधी देशपांडे याला ९६.४० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. विज्ञान शाखेत इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सेंट पाॅलचा अवलाेकित मेश्राम ९६.२०, गार्गी वसुले ९६ टक्के, साेनिश वैरागडे ९५.६० टक्के, भवन्स स्कूल सिव्हील लाईन्सचा आदित्य वाघधरे व अभिनव माेमिदी यांना ९५.४ टक्के, दिल्ली पब्लिक स्कूल मिहानचा हिर पंजवानी या विद्यार्थिनीने ९४.६ टक्के गुण घेतले आहेत.
वाणिज्य शाखेचा टक्का यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. भवन्स स्कूल, सिव्हील लाईन्सचा अथर्व विशाल लाहाेटी या विद्यार्थ्याने ९८.४ टक्के गुण मिळवत शहरातून टाॅप केले आहे. याशिवाय या शाळेतील दिशा काेठारी, भिवसनखाेरी दाभा येथील सेंट पाॅइंट शाळेचा परम चेतन वस्तानी आणि भवन्स श्रीकृष्णनगरची दिव्यांशी चव्हाण या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे ९७.६ टक्के गुण घेत द्वितीय स्थान प्राप्त केले. डिपीएस मिहानची क्रिषा भाटीया व सेंटर पाॅइंट वर्धमाननगरची रिधिमा मनाेज काला या विद्यार्थ्यांनी ९७.२ टक्के गुण घेत तिसरा क्रमांक मिळवला. याशिवाय भवन्सची पायल बिहानी व उन्नती पटेल यांना ९६.८ टक्के, सेंटर पाॅइंटची माही पटेल ९६.६ टक्के, प्रथम कुरानी ९६ टक्के, भवन्सची रिद्धी मेहाडिया या विद्यार्थिनीने ९४.२ टक्के गुण घेत गुणवत्तेत स्थान प्राप्त केले.
कला शाखेतून श्रीकृष्णनगर भवन्स स्कूलची विधी तिवारी या विद्यार्थिनीने ९७.४ टक्के गुणांसह शहरातून टाॅपची रॅंक प्राप्त केली आहे. याच शाळेतून अजरा सिरास ९७.२ टक्के गुणांसह द्वितीय स्थानी, तर स्तुती बजाज ९७ टक्के गुणांसह तृतीय स्थानी आहे. याशिवाय भवन्सचीच नीती बरडे ९५.४ टक्के, शर्वरी नंदनवार ९५.२ टक्के, यशस्वी भाेसले ९४.८ टक्के, प्रिशा सागाेळे ९४.६ टक्के, आरूष मालधुरे ९४.४ टक्के, एमकेएच संचेती पब्लिक स्कूलची भव्या बडजाते ९४.४ टक्के, सेंटर पाॅइंट वर्धमाननगरची उर्वी भद्रेश मेहता ९४ टक्के व देवराज पाटील या विद्यार्थ्याने ९२.४ टक्के गुणांसह गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.