चोऱ्या करा; महिन्याला २५ हजार पगार घ्या; बिहारी टोळीची बेराेजगारांना विचित्र ऑफर
By नरेश डोंगरे | Updated: April 14, 2026 09:15 IST2026-04-14T09:14:41+5:302026-04-14T09:15:28+5:30
Nagpur Crime News: बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे.

चोऱ्या करा; महिन्याला २५ हजार पगार घ्या; बिहारी टोळीची बेराेजगारांना विचित्र ऑफर
- नरेश डोंगरे
नागपूर - बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना चक्क ‘पगारावर’ ठेवून चोऱ्या करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केलेल्या कारवाईत टोळीतील कैलाश दास (वय ४२, जि. खगड़िया, बिहार), मिथिलेश शाह (वय २९) आणि किशन निषाद (वय २२ छत्तीसगड) या तिघांच्या मुसक्या बांधल्या. टोळीचा सूत्रधार बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील असून, सदस्य पेपर वाचण्याचा बहाणा करत चोरी करतात.
बेरोजगार तरुणांना ‘पगारावर’ गुन्हेगारी
टोळीचा सूत्रधार वर्षभर बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांचा शोध घेत असतो. त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना १५ ते २५ हजार रुपये मासिक ‘पगार’ देण्याचे आमिष दाखवले जाते. कामाबाबत विचारणा केल्यास सुरुवातीला सोपे काम असल्याचे सांगून नंतर थेट चोरी करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा प्रकारे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.
ट्रेनिंग देऊन बनवतात चोर
टोळीत नव्याने सामील झालेल्यांना सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट दिले जाते. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर हळूहळू मोठ्या चोऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाते. प्रत्येक ‘कामगिरी’नंतर पगार वाढवून त्यांना गुन्हेगारीत ओढले जाते.
रेल्वे स्थानकांभोवती जाळे
सदस्यांना नागपूर, इतवारी, भिलाई, रायगड, बिलासपूर यांसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात ठेवले जाते. गर्दी आणि प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत क्षणार्धात मौल्यवान वस्तू चोरून आरोपी पसार होतात.