नागपूर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सध्या नागपूर दौऱ्यावर असून, त्यांनी आज रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण, महिला प्रतिनिधित्व आणि महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांवर अत्यंत महत्त्वाची आणि स्पष्ट भूमिका मांडली.
पीडित कुटुंबांना नोकरी आणि ८ लाखांची मदत बंधनकारक
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देताना रामदास आठवले यांनी एक मोठी कायदेशीर तरतूद अधोरेखित केली. अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) जर एखाद्या दलित व्यक्तीची हत्या झाली, तर पीडित कुटुंबाला ८ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देणे बंधनकारक आहे," अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने विशेष शिष्यवृत्ती मंजूर केल्याचेही त्यांनी नमूद केले.
'हिंदू समाजाने पुढाकार घ्यावा'; आंतरजातीय विवाहाला समर्थन
समाजातील दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह वाढणे गरजेचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. "दलित आणि सवर्ण समाजाला एकत्र आणण्यासाठी हिंदू समाजाने स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा," असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकार विद्यार्थी वसतिगृह योजना, रमाई आवास योजना, उज्ज्वला योजना आणि दिव्यांग कल्याण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. नागपूर जिल्ह्यात सुमारे ५३ हजार दिव्यांग नागरिक असून, प्रत्येक जिल्ह्यात लवकरच वृद्धाश्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याला मोठी जबाबदारी!
महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या संघटनात्मक बदलाची मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय राहिलेले रमेश आनामुले यांची आरपीआयच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
२०२९ मध्ये पुन्हा एनडीए सरकारच येणार!
महिला आरक्षण विधेयकासाठी अपेक्षित बहुमत मिळाले नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. मात्र, आगामी राजकीय भविष्याबद्दल बोलताना, "२०२९ मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए (NDA) सरकारच सत्तेत येईल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तिसऱ्यांदा राज्यसभेत पाठवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे विशेष आभार मानले.
पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार परदेश दौरे रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सर्व मंत्र्यांना देशांतर्गत विकास आणि थेट जनसंपर्कावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत. या सूचनेचे पालन करत आपण आपले आगामी सर्व परदेश दौरे रद्द केले असून, पूर्ण वेळ देशातील जनतेच्या प्रश्नांसाठी देणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार दत्ता मेघे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
पत्रकार परिषदेपूर्वी रामदास आठवले यांनी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दत्ता मेघे यांच्याशी आमचे अतिशय जुने आणि चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांची ओळख एक अत्यंत दिलदार व्यक्ती म्हणून आहे, अशा शब्दांत त्यांनी मेघे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
Web Summary : Ramdas Athawale announced ₹8 lakh aid and job for Dalit atrocity victims' families. He advocated inter-caste marriage, RPI organizational changes, and expressed confidence in NDA's 2029 victory. He cancelled foreign trips to focus on domestic issues, following PM Modi's advice.
Web Summary : रामदास अठावले ने दलित अत्याचार पीड़ितों के परिवारों के लिए ₹8 लाख की सहायता और नौकरी की घोषणा की। उन्होंने अंतरजातीय विवाह, आरपीआई संगठनात्मक परिवर्तनों की वकालत की और एनडीए की 2029 की जीत में विश्वास व्यक्त किया। पीएम मोदी की सलाह पर उन्होंने घरेलू मुद्दों पर ध्यान केंद्रित करने के लिए विदेश यात्राएं रद्द कर दीं।