Western Railway Bandra Station Illegal Demolition: पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानक पूर्व भागात रुळांना लागून असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. परंतु, यासाठी वांद्रे रेल्वे स्थानकावरून येणारा एक रेल्वे फूटओव्हर ब्रिज पूर्व बाजूने बंद ठेवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. पश्चिम रेल्वेवरील मधला ब्रिज २३ तारखेपर्यंत बंद असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेच्या पूर्व दिशेला रुळांलगत लागून असलेल्या अनधिकृत कामांवर हातोडा चालवला जात आहे. तीन, चार ते पाच मजली बांधलेली अनधिकृत घरे पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या तोडकामाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. खार ते माहीम या दरम्यान जमावाकडून कोणत्याही प्रकारचा उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वांनी आपली पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. सुमारे ४०० ते ५०० झोपड्या तोडण्याचे काम सुरू झाले आहे. यापैकी केवळ शंभर झोपड्या अधिकृत ठरवण्यात आल्या असून त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, स्थानकाबाहेर सुरू असलेल्या या कारवाईचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. योग्य पूर्वसूचनेशिवाय ब्रिज बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
रेल्वेचा भोंगळ कारभार आणि प्रवाशांना नाहक त्रास
पश्चिम रेल्वेवरील धीम्या आणि जलद स्थानकार असलेल्या मधला एक ब्रिज पूर्व दिशेला बाहेर पडण्यासाठी बंद करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत असल्यामुळे सुरक्षेचा कारणास्तव हा ब्रिज बंद ठेवण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली. परंतु, रेल्वेची याबाबत अनास्था दिसून येत आहे. धीम्या आणि जलद स्थानकांवर जिथे ब्रिज सुरू होतो, तिथे कोणीही संबंधित अधिकारी किंवा सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आलेले नाहीत. पूर्व दिशेला जाणारा ब्रिज बंद असल्याचा सूचना फलकही लावण्यात आलेला नाही. रेल्वे स्थानकांवर घोषणा करण्यात येत असली तरी अगम्य भाषेतील घोषणेमुळे प्रवाशांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पूर्ण ब्रिज चढून वरती आल्यावर प्रवाशांना पूर्व दिशेला बाहेरचा मार्ग बंद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा खाली उतरून पुन्हा दुसरा ब्रिज चढून बाहेर पडावे लागत आहे.
मराठी कळत नाही, नीट काही सांगता येत नाही
सुरक्षा दल आणि रेल्वे यंत्रणेतील अनेक कर्मचाऱ्यांना प्रवासी मराठी बोलले, तर काही कळत नाही. मराठीत प्रश्न विचारला तर उत्तर देता येत नाही. ब्रिज का बंद आहे, किती दिवस बंद असेल, कधी सुरू होणार, याबाबत त्यांना काहीही सांगता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यांनुसार आम्ही उभे आहोत आणि प्रवाशांनी पुढे जाऊ नये, एवढेच पाहत आहोत, अशी उत्तरे दिली जात आहेत. रेल्वेने काही तिकीट तपासनीस बंदोबस्तासाठी ब्रिजवर उभे केलेले आहेत, त्यांनाही मराठीत संवाद साधता येत नाही. प्रवाशांना योग्य माहिती द्यायची सोडून ते उडवाउडवीची उत्तरे, अरेरावीची भाषा करत असल्याची माहिती मिळाली आहे.
तीन-चार मजली घरे, अनधिकृत तोडकामासाठी प्रशासन सज्ज
पश्चिम रेल्वेवरील अनधिकृत तोडक कारवाई मोहिमेसाठी गरीब नगर आणि परिसरामध्ये सुमारे ४०० कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जेसीबीच्या सहाय्याने तीन ते चार मजली असलेली घरे जमीनदोस्त केली जात आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून, मोठी तयारी केलेली आहे. गर्दी जमण्याची किंवा अशांतता निर्माण होण्याची भीती लक्षात घेता रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची पथके आणि बॅरिकेडिंग युनिट्ससह आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणाही मोक्याच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. हे पाडकाम मुंबई उच्च न्यायालयाच्या २९ एप्रिलच्या आदेशाच्या अनुषंगाने करण्यात आले असून, या आदेशाने पश्चिम रेल्वेला या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटवण्याची कार्यवाही करण्यास परवानगी दिली होती.
दरम्यान, २३ मेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पूर्व भागातून पश्चिम रेल्वेवर जाण्यासाठी असलेले ब्रिज बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी योग्य पर्यायांचा वापर करावा, असे सांगितले जात आहे.
Web Summary : Illegal structures near Bandra station are being demolished, causing commuter chaos. Bridge closures, due to safety concerns, lack proper signage and multilingual support, leaving passengers stranded and frustrated. Action continues until May 23rd.
Web Summary : बांद्रा स्टेशन के पास अवैध निर्माण तोड़े जा रहे हैं, जिससे यात्रियों में अराजकता है। सुरक्षा चिंताओं के कारण पुल बंद होने, उचित साइनेज और बहुभाषी समर्थन की कमी के कारण यात्री फंसे हुए और निराश हैं। कार्रवाई 23 मई तक जारी है।