'शेतकऱ्यांना किडनी विकावी लागणे हे दुर्दैव' मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर नागपुरात झाले व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:16 IST2026-05-19T15:15:04+5:302026-05-19T15:16:37+5:30
Nagpur : नाम फाउंडेशनवे सह-संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही आपल्या बेधडक शैलीत थेट यंत्रणेवर बोट ठेवले. 'आज देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला स्वतःच्या उपचारासाठी किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागत आहे, हे या देशाचं आणि आपल्या संपूर्ण व्यवस्थेचं सर्वात मोठं दुर्दैव आहे'

'It is unfortunate that farmers have to sell their kidneys' expressed Makarand Anaspure and Nana Patekar in Nagpur
नागपूर : नाम फाउंडेशनवे सह-संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही आपल्या बेधडक शैलीत थेट यंत्रणेवर बोट ठेवले. 'आज देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्याला स्वतःच्या उपचारासाठी किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागत आहे, हे या देशाचं आणि आपल्या संपूर्ण व्यवस्थेचं सर्वात मोठं दुर्दैव आहे,' अशी विदारक वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पाणी आणि पिकाला हमीभाव मिळाला, तर तो ताठ कण्याने उभा राहील. जनतेने 'नाम'वर विश्वास ठेवून अवघ्या ३ महिन्यांत ६० कोटींचं दातृत्व दाखवलं, ज्यातून गावोगावी नाल्यांचं खोलीकरण व तलावांचं पुनरुज्जीवन झालं. आत्महत्या रोखायच्या असतील, तर पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणं हाच एकमेव मार्ग असल्याचं अनासपुरे म्हणाले.
केवळ भाषणाबाजी नको, आता कृती करा!
आपल्या खास शैलीत बोलताना नाना पाटेकर यांनी शहरांमधील सिमेंटच्या जंगलांवर तीव्र खंत व्यक्त केली. ते म्हणाले, 'मला या शहरांमध्ये राहणं असा होतंय. तिथल्या सिमेंटच्या उत्तुंग भिंती मला कबरीसारख्या वाटतात निसर्गाने आपल्याला मोफत श्वास दिलाय, त्याचं भान ठेवा. आता फक्त एसी खोलीत बसून भाषणं ठोकून चालणार नाही, तर गावागावांत भटकून प्रत्यक्षात जमिनीवर काम करावं लागेल.'
राजकारणावर परखड भाष्य करताना नानांनी स्पष्ट सुनावलं, 'आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे पाईक नाही. भाजप असो वा काँग्रेस, तुमची विचारसरणी वेगळी असेल; पण पाणी आणि सामाजिक प्रश्न सोडवताना आपण सर्व फक्त आणि फक्त एक नागरिक आहोत. त्यामुळे गट-तट बाजूला ठेवून जलसंधारण व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांनी आता एकत्र यावं.