व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:11 IST2020-05-28T23:11:34+5:302020-05-28T23:11:39+5:30

ठेवींवरील व्याज कमी झाल्याने बँकांनी कर्जावरील व्याजाचे दरही कमी केले आहेत.

 Even if interest rates fall, debt does not rise | व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत, परंतु कर्जाला उठाव नाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली.

स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक आदी बँकांनी आपले व्याजदर कमी केले आहेत. अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे रेपो-लिंक्ड-रेट (आरएलआर) ही पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास व्याजाचा दर आपोआप कमी अथवा जास्त होतो. सध्या ठेवीवरील व्याजदर २.९० टक्के ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१० टक्के यादरम्यान आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यावर ०.५० टक्के अधिक व्याज मिळते, परंतु हे दर फारच कमी असल्याने खासगी क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. हरिभाऊ नागमोते एसटीमधून सेवानिवृत्त झाले. माझे बँक ठेवीवरील मासिक व्याज १४ हजारांवरून १३ हजारांवर आले आहे. पेन्शन नसल्याने हा माझ्यासाठी मोठा आघात आहे, असे नागमोते म्हणाले.

ठेवींवरील व्याज कमी झाल्याने बँकांनी कर्जावरील व्याजाचे दरही कमी केले आहेत. सध्या बहुतेक बँकांचा गृहकर्जाचा दर ७.२५ ते १०.२५ टक्क्यांदरम्यान आहे, तर व्यक्तिगत कर्जाचा दरही १० ते १२ टक्के झाला आहे.पण सध्या कोविड-१९ च्या लॉकडाउनमुळे बहुतेक नागरिकांची प्राथमिकता व्यक्तिगत सुरक्षेकडे आहे. परिणामी व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज अथवा गृहकर्जाला मागणीच नाही, अशी माहिती बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी दिली.

विनातारण कर्जाला मागणी कमी

कोविड-१९ साठी केंद्र सरकारने जे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, त्यात ३ लाख कोटी लघु व मध्यम उद्योगांना विनातारण कर्जासाठी ठेवले आहेत. सध्या थकीत असलेल्या खेळत्या भांडवल कर्जाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज चार वर्षांत परतफेडीच्या कराराने उद्योजकांना मिळणार आहे. पण त्यालाही फारसा उठाव नाही, अशी माहिती बँक अधिकाºयांनी दिली. या पार्श्वभूमीवर सध्या गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना ३ लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज देण्याची अनोखी योजना बँक आॅफ महाराष्ट्रने आणली आहे, अशी माहिती झोनल मॅनेजर मनोज करे यांनी दिली.

Web Title:  Even if interest rates fall, debt does not rise

टॅग्स :nagpurनागपूर