महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:33 IST2026-04-21T14:31:47+5:302026-04-21T14:33:07+5:30
महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या विधेयकाच्या बाजूने जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी देशातील ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठाचा महिला विरोधी मुखवटा उघड करण्यासाठी महायुतीतील सगळे पक्ष एकत्रित येऊन जनआंदोलन करून महिलांमध्ये जनजागृती करतील. तसेच महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या विधेयकाच्या बाजूने जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
मुंबईत घेतलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, या जनआंदोलनातून विरोधकांवर दबाव निर्माण केला जाईल आणि त्यांना या विधेयकाला समर्थन देण्यास भाग पाडले जाईल. १७ एप्रिल रोजी संसदेत जे घडले, तो देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण मिळत नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
खुल्या चर्चेचे आव्हान
विरोधी पक्षांकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी त्यांना खुले आव्हान देतो, माझ्या स्तरातल्या त्यांच्या कुठल्याही नेत्याने माझ्यासोबत महिला विधेयकावर खुली चर्चा करावी, पण ते करणार नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल, डीएमके, उबाठा, शरद पवार गट, समाजवादी पार्टी अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले. विरोधकांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली आणि आनंदोत्सव साजरा केला, तो एकप्रकारे समाजसुधारकांच्या विचारांवर केलेले तांडव होते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
राहुल गांधी खोटारडेपणाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेते
एखादी व्यक्ती किती खोटे बोलू शकते याच्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तर त्याचे सुवर्णपदक राहुल गांधींना मिळेल. हे विधेयक म्हणजे संविधानाने दिलेल्या संकेतांनुसारच होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महिला आरक्षणासाठी आग्रही होते. पण काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे, पण ते तसे करणार नाहीत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत यावेळी नमूद केले.
विरोधक म्हणाले... कधी, कुठे यायचे ते सांगा
महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते, पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयक आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, सोनिया गांधी यांनी त्यापुढे जात ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवले. यासाठी काँग्रेसने कोणत्याही अटी टाकल्या नव्हत्या. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? ५४३ सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात चर्चा करायला तयार आहे. त्यांनी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे सांगत शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही फडणवीसांचे आव्हान स्वीकारले आहे.