"वहिनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करावा लागला, पण दादा....!"; तटकरे यांनी सांगितली अजित पवारांची खास आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 22:38 IST2026-02-26T22:38:02+5:302026-02-26T22:38:51+5:30
आज, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी, तटकरे बोलत होते.

"वहिनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करावा लागला, पण दादा....!"; तटकरे यांनी सांगितली अजित पवारांची खास आठवण
लोकसभा निवडणुकीत वहिनी आपल्याला पराभव पत्करावा लागला. पण दादांसारखा दिलदार नेता, एका बाजूला पराजय झाला तरी संध्याकाळी पाच वाजता मला फोन करून सांगितले की, 'उद्या एनडीएची बैठक आहे, तुला आणि प्रफुल भाईला तिथे जायचे आहे. 'मी सांगितले, मी जाईन दिल्लीला, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. त्यांना भेटलो आणि मग मी दिल्लीला गेलो, कारण माझ्यासाठी दिल्लीपेक्षा दादा हेच माझे सर्वस्व होते. त्यामुळे मी आधी त्यांना भेटलो, त्यांना अभिवादन केले आणि मग दिल्लीला गेलो आणि मग एनडीएमधला प्रवास आपण सर्वांनी पाहिला," अशी आठव राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितली.
आज, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी, तटकरे बोलत होते.
तटकरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने आपल्याला पराभव पत्करावा लागल्यानंतर, राज्याच्या राजकारणात एक वेगळी स्थिती निर्माण झाली. असे सांगण्यात आले की, आता अजित दादांचे महाराष्ट्रात काही चालणार नाही. त्यावेळी मी एक वाक्य बोललो होतो की - 'आता महाराष्ट्रात अजित पर्व सुरू होत आहे.' अनेकांनी माझ्यावर टीका केली, पण 'अजित पर्व' हा शब्द समोर ठेवत आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनी साथ दिली आणि त्यातून एक योग्य वाटचाल करण्याचा प्रयत्न केला."
"तेव्हा सकाळच्या उठण्यावरून दादांना हिनवले गेले" -
तटकरे पुढे म्हणाले, "दादांचा सकाळी ५-६ वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवलेला आहे. त्याबद्दल देशात वेगळे कौतुक आहे. काय बोलले गेले? 'दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, असे त्या कालावधीत हिनवले गेले. माझ्यासारख्याने त्यावेळी सांगितले की, दूधवाला पण उठतो, पण दुधवाला लोकांची सेवा करण्यासाठी उठतो, पेपरवाला लोकांची सेवा करण्यासाठी येतो; तसेच दादा हे एक असे निखळ व्यक्तिमत्व आहे, तेसुद्धा या सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्न आहे. कोण काय बोलले हे सर्वांना माहिती आहे." एवढेच नाही तर, "असेही म्हटले गेले की सकाळी उठण्याची त्याची सवय आहे, ते लवकर उठतात, त्यांच्या पत्नीची काहीतरी मजबुरी असेल."
जन सन्मान यात्रेतली आठवण -
विधानसभा निवडणुकी दरम्यानची एक गोष्ट सांगताना तटकरे म्हणाले, "'जन सन्मान यात्रे'च्या निमित्ताने आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो. मी असा एक अध्यक्ष निघालो की दादांनी पूर्ण वेळ बोलले पाहिजे, म्हणून मी कधी भाषण केले नाही. माझी इच्छा होती की बारामतीला मी भाषण करावे, वहिनींना पण वाटत होते, पार्थ आणि जयलाही वाटत होते. पण बारामतीमधून दादांची निघालेली ती अभूतपूर्व मिरवणूक! त्यांनी दोन गाड्या बदलल्या, त्या दोन्ही गाड्यांच्या काचा लोकांकडून फुटल्या, एवढे प्रचंड स्वागत दादांचे त्या मिरवणुकीत झाले होते."