Want to go to jail for a day ?; Reasonable fee will be charged, application has to be made | भन्नाट! एका दिवसासाठी जेलमध्ये जायचंय?; माफक शुल्क घेणार, करावा लागेल अर्ज

भन्नाट! एका दिवसासाठी जेलमध्ये जायचंय?; माफक शुल्क घेणार, करावा लागेल अर्ज

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘जेल टुरिझम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर येथील कारागृहे स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात बंदिस्त होती. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठडीही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार येरवडा कारागृहातील ज्या आंब्याच्या झाडाखाली झाला होता, त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. 

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खासकरून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी, या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहातही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

माफक शुल्क घेणार, करावा लागेल अर्ज
पर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती वा संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅग, मोबाईल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आत नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडिओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जातील. प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना ५० रुपये शुल्क असेल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Want to go to jail for a day ?; Reasonable fee will be charged, application has to be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.