Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 07:37 IST2026-04-23T07:36:40+5:302026-04-23T07:37:44+5:30
Mumbai-Pune Expressway Mega Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलाचे काम आणि शटरींग काढण्यासाठी २३ आणि २४ एप्रिल रोजी दुपारी तीन तासांचा 'ट्रॅफिक ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या काळात दोन्ही दिशेकडील वाहतूक ठराविक वेळेत बंद ठेवून ती पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आज, २३ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहने किवळे देहूरोड, तळेगाव आणि राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे कुसगाव टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेला वळविण्यात येतील. त्यानंतर उद्या, शुक्रवारी पुणे वाहिनीवरील पुलाचे शटरींग काढण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरही तीन तासांचा ब्लॉक असेल. हा ब्लॉक देखील दुपारी १२:०० ते ३:०० वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकदरम्यान, पुणे वाहिनीवरील वाहतूकही राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून वळवण्यात येईल.
प्रवाशांना आवाहन
दुपारच्या कडक उन्हात तीन तास वाहतूक वळवण्यात आल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याची आणि प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच आपला प्रवास सुरू करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.