लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:12 IST2026-04-23T09:11:51+5:302026-04-23T09:12:48+5:30

ज्याचे ‘होर्मुझवर वर्चस्व, त्याचे जागतिक राजकारणावर नियंत्रण’ ही जुनी धारणा आजही प्रबळ आहे, हे इराणने या युद्धात दाखवून दिले.

The Strategic Shield of Iran: Why the Strait of Hormuz Remains the Ultimate Chokepoint in Global Geopolitics | लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!

लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!

डॉ. रोहन चौधरी
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक

अत्याधुनिक तंत्रज्ञान, संहारक शस्त्रास्त्रं, जगातील सर्वांत मोठे लष्कर,  इस्रायलसारखा साथीदार, बड्या राष्ट्रांचे मौन आणि सोबतीला ट्रम्प आणि नेतन्याहूंसारखे आक्रमक आणि क्रूर नेतृत्व. इतकी सगळी अनुकूल परिस्थिती असूनदेखील इराणला मात देणे अमेरिकेला शक्य झाले नाही. या युद्धात अमेरिकेला विजयापासून आणि इराणला पराभवापासून दूर नेणारा कोणता घटक निर्णायक ठरला? इराणच्या या कडव्या प्रतिकारामागचे रहस्य काय? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत  ती पर्शियन आखातामधील होर्मुझ सामुद्रधुनीत. 

भूराजनीतिकदृष्ट्या विचार करता होर्मुझव्यतिरिक्त मलाक्काची सामुद्रधुनी, सुएझ कालवा, पनामा कालवा, तसेच बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी हे अरुंद जलमार्ग आहेत. परंतु युद्धात निर्णायक ठरेल इतके अनन्यसाधारण महत्त्व होर्मुझचे कसे? नेमके याच प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. वर्तमानातच नाही तर १६व्या शतकापासून जागतिक सत्तासंघर्षाच्या आणि जागतिक व्यापाराच्या केंद्रस्थानी होर्मुझची सामुद्रधुनी राहिली आहे. पोर्तुगीज साम्राज्याचे एक अत्यंत प्रभावशाली सेनानी, नौदलप्रमुख अफोंसो दि अल्बुकर्क यांनी १५१५ मध्ये होर्मुझवर पोर्तुगीजांचे वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे पर्शियन आखातातील संपूर्ण व्यापार पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला. ज्याचे ‘होर्मुझवर वर्चस्व, त्याचे जागतिक राजकारणावर नियंत्रण’ ही धारणा जागतिक राजकारणात प्रबळ झाली.  ती आजपर्यंत प्रबळ आहे, हे इराणने या युद्धात दाखवून दिले.

१६२२ मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वर्चस्वाचा दुसरा अंक ब्रिटिशांच्या आगमनाने सुरू होतो. ‘कॅप्चर ऑफ होर्मुझ’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सफवीद साम्राज्याचे सर्वांत प्रभावशाली शासक शाह अब्बास प्रथम यांच्याकडून पोर्तुगीजांचा पराभव झाला. आखातात अनियंत्रित प्रवेश आणि व्यापार करण्याची सूट अशा दुहेरी फायद्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी आणि अर्थातच ब्रिटिशांकडून होर्मुझवरील पोर्तुगीजांची एकाधिकारशाही संपुष्टात आली. प्रख्यात इतिहासकार के. एम पन्नीकर यांनी तर या कालखंडाला युरोपियन साम्राज्याचा आरंभ आणि भारतीय पारतंत्र्याची सुरुवात असे संबोधले आहे. यावरून पर्शियन आखाताचे आणि प्रामुख्याने होर्मुझचे ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व लक्षात येते.

१९व्या शतकातदेखील होर्मुझचे महत्त्व चिरस्थायी राहिले.  विशेषतः १८२० ते १८५३ हा काळ होर्मुझची सामुद्रधुनी आणि आधुनिक जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. ईस्ट इंडिया कंपनीने रचलेल्या पायावर ब्रिटिशांनी कळस चढविण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धाऐवजी स्थानिक गरजा लक्षात घेत कराराद्वारे होर्मुझवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याची ब्रिटिशांची योजना होती. १८२० मधील ‘जनरल मॅरिटाइम करार’ आणि १८५३ मधील ‘पर्पेच्युअल मॅरिटाइम ट्र्यूस’ हे दोन्ही करार होर्मुझविषयी ब्रिटिशांच्या लेखी असणारे महत्त्व अधोरेखित करतात. समुद्रीचाच्यांपासून होर्मुझचा व्यापारीमार्ग सुरक्षित करणे, तसेच परस्परांतील संघर्ष थांबविणे ही जबाबदारी ब्रिटिशांची आहे, हे या कराराद्वारे नमूद करण्यात आले. इतिहासाची पाने उलटताना हे करार म्हणजे फक्त कागदपत्रे नव्हती तर ब्रिटिश साम्राज्याचा होर्मुझच्या साहाय्याने जागतिक राजकारणातील सामर्थ्याचा आगाज होता हे समजून येते.

२०व्या शतकातदेखील होर्मुझचे आर्थिक, राजकीय आणि सामरिक प्राबल्य अबाधित राहिले. पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्या सामर्थ्याचे गुपित समजलेल्या अमेरिकेनेदेखील पर्शियन आखातावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी स्थानिकांच्या मदतीने पोर्तुगीजांची एकाधिकारशाही संपुष्टात आणली; त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणच्या मोहम्मद रजा पहेलवी यांच्या मदतीने पर्शियन आखातात स्वतःचे प्राबल्य निर्माण केले; परंतु १९७३ चे इंधन संकट आणि १९७९ च्या इराणमधील क्रांतीने इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंधात कटुता निर्माण झाली आणि होर्मुझ हे जागतिक सत्तासंघर्षाचे केंद्र बनले. 

१९७३ च्या तेलसंकटाने जगाला प्रथमच दाखवून दिले की ऊर्जा हे केवळ आर्थिक साधन नाही, तर एक प्रभावी सामरिक शस्त्र आहे. होर्मुझचे ऐतिहासिक महत्त्व समजलेल्या इराणने याचा सामरिक फायदा घेण्यास सुरुवात केली. होर्मुझ बंद करण्यापेक्षा  बंद होण्याची भीतीच जगाला अस्थिर करण्यासाठी पुरेशी आहे, हे इराणने जाणले आणि आपले धोरण त्या पद्धतीने आखण्यास सुरुवात केली.  

१९८०-१९८८ च्या दरम्यानच्या ‘टँकर युद्धात’ इराणच्या हॉर्मुझमधील धोरणाची प्रचीती जगाला आली. इराणकडून व्यापारी जहाजांवर सातत्याने हल्ले झाले. त्यामुळे जागतिक तेलपुरवठा अस्थिर झाला. याचे परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर जाणवले. या युद्धाचा निर्णायक निकाल इराणला अपेक्षित असा लागला नसला, तरीही होर्मुझचा वापर सामरिकदृष्ट्या कसा करायचा, याचे कौशल्य इराणला चांगलेच अवगत झाले. आपल्या भूराजनीतिक सामर्थ्याची जाणीव झालेल्या इराणने २१व्या शतकाच्या प्रारंभीच पर्शियन आखातात अपरंपरागत युद्धाचे धोरण अवलंबविण्यास सुरुवात केली. याच सामर्थ्याचा वापर करून इराणने अमेरिकेलादेखील या युद्धात नामोहरम तर केलेच; परंतु होर्मुझची सामुद्रधुनी आजही जगाचे आर्थिक गणित बिघडवू शकते याची जाणीवदेखील करून दिली.

२१ व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही भूराजनीतीचे पुनरागमन कसे होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून या युद्धाची भविष्यात दखल घेतली जाईल. पोर्तुगीजांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि अमेरिकेपासून ते इराणपर्यंतच्या चार शतकांच्या इतिहासात सर्वांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपले सामर्थ्य हवेहवेसे वाटणे यातच होर्मुझच्या सामुद्रधुनीचे जागतिक राजकारणातील विलक्षण विशेषपण आहे.

Web Title : होरमुज़ जलडमरूमध्य: डोनाल्ड ट्रम्प को झुकाने वाला रहस्य!

Web Summary : होरमुज़ जलडमरूमध्य का रणनीतिक महत्व, वैश्विक व्यापार और शक्ति को नियंत्रित करना, अमेरिकी सैन्य शक्ति के बावजूद वर्चस्व को विफल करता है। 16वीं शताब्दी से ऐतिहासिक रूप से महत्वपूर्ण, होरमुज़ पर नियंत्रण ने वैश्विक राजनीति को आकार दिया है, ईरान ने इस संघर्ष में यह सबक दिखाया।

Web Title : Hormuz Strait: The secret that humbled Donald Trump, explained.

Web Summary : The Hormuz Strait's strategic importance, controlling global trade and power, foiled American dominance despite military might. Historically vital since the 16th century, control over Hormuz has shaped global politics, a lesson Iran demonstrated in this conflict.