Laura Woolvard Century INDW vs SAW T20: दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताविरुद्धचा तिसरा टी२० सामना जिंकत धडाकेबाज कामगिरी केली. यासह त्यांनी ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आणि मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी२० सामन्यात भारताला ९ गडी राखून पराभूत केले. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी२० सामन्यात भारताला ६ गडी राखून आणि दुसऱ्या टी२० सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने धावांचा पाठलाग करताना टी२० मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. त्यात कर्णधार लॉरा वुल्फार्टने महत्त्वाची भूमिका बजावली आणि स्मृती मंधाना, मेग लॅनिंग यांच्या नावावर असलेल्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
लॉरा वूल्फार्टचे दमदार शतक
टी२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात शफाली वर्माच्या ६४ धावा आणि हरमनप्रीत कौरच्या ६६ धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्फार्टने पहिल्या चेंडूपासूनच दमदार खेळी केली. तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात जलद शतक झळकावले. या वादळी शतकामुळे तिच्या संघाला विजयाचा मार्ग सोपा झाला. लॉराने ५३ चेंडूंमध्ये ११५ धावांची खेळी केली. २१६.९८च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत ५ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. लॉराने ४७ चेंडूंमध्ये आपले टी२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे चौथे सर्वात जलद शतक ठरले. लॉराचे हे तीनही फॉरमॅटमध्ये मिळून १७वे शतक ठरले. तिच्या आधी केवळ स्मृती मानधना आणि मेग लॅनिंग या दोघांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची लॉराने बरोबरी केली.लॉराने कसोटीत एक, एकदिवसीय सामन्यांमध्ये १३ आणि टी२० सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत.
भारताविरुद्धची टी२० मालिका जिंकली
लॉरा वोल्फार्टने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या तीनही सामन्यांमध्ये ५०पेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यात तिने अर्धशतक (५१ आणि ५४) ठोकले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात थेट ११५ धावा केल्या. तिने आतापर्यंत २२० धावा केल्या आहेत. ती केवळ मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाजच ठरली नाही, तर तिने आपल्या संघाला टी२० मालिका जिंकण्यासही मदत केली आहे. पुढील दोनही सामने जिंकून टीम इंडियाला व्हाईटवॉश देण्याचा तिचा मानस आहे.