Share Market: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला, जेव्हा सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी कोसळला आणि निफ्टीनं २४,२०० च्या महत्त्वाच्या पातळीहून खाली आला. बाजारात विक्रीचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स ७२५.५८ अंक म्हणजेच ०.९२% घसरून ७७,७९०.९१ वर पोहोचला. तर निफ्टी २०५.१० अंक म्हणजेच ०.८४% तुटून २४,१७३ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. मात्र, काही शेअर्समध्ये खरेदीही दिसून आली. सुमारे ११९३ शेअर्समध्ये तेजी राहिली, तर १०९५ शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.
'या' शेअर्समध्ये तेजी / घसरण
निफ्टीवर डॉ. रेड्डीज, ओएनजीसी (ONGC), जिओ फायनान्शियल, सिप्ला आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, इंटरग्लोब एव्हिएशन, अल्ट्राटेक सिमेंट, एसबीआय (SBI) लाईफ, एशियन पेंट्स आणि एम अँड एम (M&M) यांसारख्या दिग्गज शेअर्समधील घसरणीनं बाजारावर दबाव वाढवला.
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
कच्च्या तेलाची किंमत ठरलं मोठं कारण
बाजारातील घसरणीचं सर्वात मोठं कारण कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ मानली जात आहे. ब्रेंट क्रूड १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं असून, यामुळे महागाई आणि चालू खात्यातील तुटीबाबत चिंता वाढली आहे. भारतासारख्या मोठ्या आयातदार देशासाठी ही परिस्थिती बाजारावर दबाव निर्माण करते.
मोठ्या गुंतवणूकदारांची विक्री
परदेशी आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार दोघांनीही बाजारात विक्री केली आहे. गेल्या सत्रात FIIs नी २,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स विकले, तर DIIs नी देखील १,००० कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली. यामुळे बाजारातील कमकुवतपणा अधिकच वाढला.
