IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:56 IST2026-04-23T08:50:55+5:302026-04-23T08:56:28+5:30
दिल्लीत एका अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करुन पळ काढलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
IRS officer's daughter's rape-murder: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अमर कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. तपासात तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक शक्यताही पोलिसांनी वर्तवली असून, याप्रकरणी घरातील जुन्या नोकराला अटक करण्यात आली आहे.
सुरक्षेची ४ चक्रे भेदून तो घरात शिरला
सर्वात थक्क बाब म्हणजे, ज्या घरात ही घटना घडली तिथे सुरक्षेची अत्यंत कडक व्यवस्था होती. घराच्या प्रत्येक मजल्यावर लॉक सिस्टीम आणि लिफ्टसाठी रिस्ट्रिक्टेड एन्ट्री होती. पीडितेच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी ४ मुख्य दरवाजे पार करावे लागत होते, ज्यापैकी ३ दरवाज्यांना पासकोड होते.
अटक करण्यात आलेला आरोपी राहुल मीणा (२३) याने यापूर्वी ८ महिने तिथे काम केले होते. त्यामुळे त्याला घराचा नकाशा, डिजिटल पासकोड आणि चाव्या कुठे ठेवल्या जातात, याची सगळी माहिती होती. याच माहितीचा गैरफायदा घेत त्याने बुधवारी सकाळी ६:२८ वाजता घरात प्रवेश केला.
नेमकी घटना काय?
२२ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ६:३० च्या सुमारास पीडितेचे आई-वडील जिम आणि मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. मुलगी घरात एकटीच होती. ती इंजिनिअरिंग पदवीधर असून सध्या युपीएससीची तयारी करत होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल मीणा पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या पँटमध्ये सोसायटीत शिरताना दिसला. आरोपीने घरात घुसून मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार केला असावा, कारण तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. आरोपीने अत्यंत क्रूरपणे मोबाईल चार्जरच्या केबलने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. डोक्यावरही वार करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७:२२ तो कपडे बदलून आणि पाठीवर बॅग घेऊन पसार झाला.
सकाळी ८ वाजता जेव्हा आई-वडील घरी परतले, तेव्हा त्यांना त्यांची लेक रक्ताच्या थारोळ्यात आणि अर्धवट कपड्यांमध्ये मृतावस्थेत आढळली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि काही मौल्यवान वस्तूही गायब होत्या.
नोकरीवरून काढल्याचा घेतला सूड
आरोपी राहुल मीणा हा मूळचा राजस्थानच्या अलवरचा आहे. सहा आठवड्यांपूर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तो घरच्या कामासाठी घेतलेल्या पैशांची अफरातफर करायचा आणि दुकानदारांची उधारी करायचा. याच रागातून आणि सूड घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलिसांनी १५ पथके तैनात केली होती. सीसीटीव्ही आणि ऑटो रिक्षा चालकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. तो द्वारका येथील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता, जिथून त्याला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी राहुल मीणा याने दिल्लीत येण्यापूर्वी मंगळवारी रात्री राजस्थानच्या अलवरमध्येही एका शेजारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.