टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:02 IST2026-04-16T10:02:08+5:302026-04-16T10:02:36+5:30
TCS case: नाशिक शहरातील टीसीएस कंपनीच्या कार्यालयात उघडकीस आलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक, मानसिक व भावनिक छळासह धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती आता अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे.

टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
नाशिक - शहरातील टीसीएस कंपनीच्या कार्यालयात उघडकीस आलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक, मानसिक व भावनिक छळासह धर्मांतर प्रकरणाची व्याप्ती आता अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रकरणामागे परकीय कट्टरपंथीय संघटनांचे फंडिंग आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, यासाठी एटीएस व एनआयएशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.
दरम्यान, कंपनीतील सर्वच १६० कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचा जाब जबाबात नाशिकची एचआर हेड निदा खान हिच्याबद्दल अधिकाऱ्यांना काही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून ती सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कामगार उपायुक्त कार्यालयातील टीमने कंपनीमध्ये मंगळवारी सायंकाळी छापा टाकला असता, तेथे एकही कर्मचारी आढळून आला नाही.
अश्विनी चैनानी यांना न्यायालयीन कोठडी
या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयित महिलाआरोपी अश्विनी चैनानी यांना अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांनी बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, एका पीडितेच्या फिर्यादीत चैनानी यांच्याकडे तक्रार करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करीत अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मुंबई नाका पोलिसांनी बुधवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चैनानी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.