“पार्थ अजित पवार आमच्या पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार असतील”; प्रफुल्ल पटेलांनी केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:54 IST2026-02-26T20:53:08+5:302026-02-26T20:54:44+5:30
Parth Ajit Pawar News: प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थ अजित पवार यांचे नाव जाहीर केले.

“पार्थ अजित पवार आमच्या पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार असतील”; प्रफुल्ल पटेलांनी केले जाहीर
Parth Ajit Pawar News: अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी देशभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थ अजित पवार यांचे नाव जाहीर केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थिती सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काय होणार, विलीनीकरणाची प्रक्रिया कशी राबवली जाणार याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात होते. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राज्यसभेचे उमेदवार म्हणून करण्यात आली.
पार्थ अजित पवार आमच्या पक्षाचे राज्यसभेचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीने, यामध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील असून, आम्ही सर्वांनी मिळून एकमताने निर्णय घेतला आहे. या ठिकाणी स्पष्ट करतो की, आता राज्यसभेची जी निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठी ५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे की पार्थ अजित पवार हे आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, दुसरीकडे पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, आता हा मुद्दा पुन्हा एकदा मागे पडण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाचे दरवाजे बंद झाले आहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.