‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 06:35 IST2026-01-25T06:33:57+5:302026-01-25T06:35:44+5:30
Prithviraj Chavan Criticize Devendra Fadnavis: दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दावोसच्या दौऱ्यादरम्यान देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी लाखो कोटींचे करार केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या करारांमध्ये भारतातीलही बहुतांश कंपन्यांचा समावेश होता. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे करार झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
या पोस्टमध्ये चव्हाण पुढे लिहितात की, मागील दाव्होस दौऱ्यातील करारांपैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक आणि त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्रातीलच कंपन्यांसोबत दावोसमध्ये झालेल्या करारांवरही त्यांनी टीका केली. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोसमध्ये करार करण्याबद्दल कर्नाटक सरकारमधील उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी करार करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अदाणी आणि लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
तसेच आत्तापर्यंत दावोसमध्ये घोषणा केलेल्या करारांवर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा सवालही चव्हाण यांनी या पोस्टच्या माध्यमातून विचारला.
