Latest Marathi News Live: डोनाल्ड ट्रम्प यांचा PM नरेंद्र मोदींना फोन
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 21:09 IST2026-03-24T09:46:13+5:302026-03-24T21:09:12+5:30
Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच ...

Latest Marathi News Live: डोनाल्ड ट्रम्प यांचा PM नरेंद्र मोदींना फोन
Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi: इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा केली असली, तरी इस्रायल काही थांबण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. त्यांनी इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे या सगळ्यातून मार्ग निघणं अवघडच दिसतंय. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत सविस्तर निवेदन केलं आणि भारतापुढील आव्हानांची देशवासीयांना जाणीव करून दिली. केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण इंधन आणि ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याचीही गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेली काही जहाजं भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं एलपीजी टंचाईतून काहीसा तोडगा निघू शकतो. महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवे कारनामे, कुकर्म समोर येत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून झालेला राडा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचंही बोललं जातंय. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
24 Mar, 26 : 07:48 PM
डोनाल्ड ट्रम्प यांचा PM नरेंद्र मोदींना फोन
मध्य पूर्वेतील युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करण्याची घोषणा केली असली तरी इराणकडून येणारी प्रतिक्रिया पाहता संघर्ष बंद होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे वृत्त समोर आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाली. त्याशिवाय स्ट्रेट होर्मुझ खुला करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. अमेरिका-इस्रायल यांनी इराणवर हल्ला केल्यानंतर इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. इराणकडून सातत्याने आखाती देशांवरही हल्ले करण्यात आले. त्यात भारताने या सर्व परिस्थितीत शांतता आणि चर्चेची भूमिका घेतली होती. त्यामुळे ट्रम्प आणि मोदी यांच्यातील फोन संवाद महत्त्वाचा असल्याचं बोलले जाते. (सविस्तर वाचा)
24 Mar, 26 : 07:46 PM
जालना : भोंदू बाबा खरात यांची नार्को चाचणी करावी; सत्य बाहेर येईल नवनाथ वाघमारे यांची मागणी
राज्यभरात चर्चेत असलेले स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू बाबा खरात बाबा यांचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे आरोप असून, यामागे काही नेते आणि मंत्र्यांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सत्य उलगडण्यासाठी भोंदू बाबा खरात यांची तात्काळ नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना येथे सरकारकडे केली आहे.
24 Mar, 26 : 07:46 PM
बुलढाणा: 1300 कोटींच्या प्रकल्पात 700 कोटी निधी अप्राप्त, कंत्राटदारांचे 150 कोटी अडकले
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालया मार्फत सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजना या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांचे 150 कोटी रुपये अडकले असून प्रकल्पाचे सातशे कोटींचे कामे पूर्णच झाली नाही ..या मुळे या एकंदरीत योजनेवरच गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे..वर्ष 2018 मध्ये मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला जलजीवन मिशन चा जिल्ह्यातील हा प्रकल्प 1300 कोटी चा होता .
24 Mar, 26 : 06:58 PM
अशोक खरातसोबत संबंध, फोटो असलेल्या नेत्यांचीही चौकशी होणार?
अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कुकृत्यांचा पाढा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक खरातवर कठोर कारवाईचे संकेतही दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळी उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अशोक खरातसोबत संबंध आणि फोटो असलेल्या अधिकारी, नेतेमंडळींचीही चौकशी होणार का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. (सविस्तर वाचा)
24 Mar, 26 : 06:58 PM
अशोक खरातसोबत संबंध, फोटो असलेल्या नेत्यांचीही चौकशी होणार? फडणवीसांचं मोठं विधान
या प्रकरणामध्ये ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची आम्ही चौकशी करू. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण सगळे राजकारणात आहोत. त्यामुळे कुणाचाही फोटो कुणासोबतही येतो हे आपण पाहिलेलं आहे. नुसता फोटो कुणासोबतही आहे, म्हणून एखाद्याला आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलिटेड डेटाही काढत आहोत. त्यामुळे डिलिटेड डेटामध्ये कुणाचा संपर्क होता का? कुणी व्यवहार केला आहे का, कुणी मेसेज केले आहेत का? या गोष्टीत जो कुणी असेल, त्याची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
24 Mar, 26 : 06:21 PM
बीडमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणात कुटुंबियांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खटल्याला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली, मात्र सुनावणीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेल्या एका आरोपाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. "आम्हाला आणि आमच्या नातेवाईकांना केस मागे घेण्यासाठी सतत धमकीचे फोन येत आहेत," असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे
24 Mar, 26 : 05:55 PM
तब्बल १३ वर्षे कोमात राहिलेल्या हरीश राणा यांचे निधन
'इच्छामरणा'ची मागणी करत 'एम्समध्ये दाखल झालेले हरीश राणा यांचे निधन झाले आहे. 'पॅसिव्ह युथनेशिया'साठी परवानगी मिळणारे ते भारतातील पहिलेच व्यक्ती होते. १३ वर्षांहून अधिक काळ कोमामध्ये राहिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ही परवानगी दिली होती.
24 Mar, 26 : 05:00 PM
खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन
२०२४ मध्ये शिर्डीतील एका महिलेची तक्रार. नीरज जाधवच्या सहभागाबद्दल पुरावा आढळून आलेला नाही. अशोक खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर बलात्कार करण्यात आला. ८ महिलांचे ३५ व्हिडीओ समोर आले. व्हायरल झालेले व्हिडीओ संबंधित प्लॅटफॉर्मवरून काढण्याचं काम सुरू आहे. खरातशी संबंधित असलेल्या संस्थानांची चौकशी सुरू आहे - देवेंद्र फडणवीस
24 Mar, 26 : 04:03 PM
नागपूरकरांनो घाबरू नका! पेट्रोलचा तुटवडा ही केवळ अफवा
गेल्या काही तासांपासून नागपूर शहरातील पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि नागरिकांमध्ये पसरलेली भीती यावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नागपुरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी विनाकारण 'पॅनिक मोड'मध्ये येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
24 Mar, 26 : 03:26 PM
महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात
नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका ३४ वर्षीय शिक्षिकेने खरातवर गंभीर आरोप करत त्याच्या भयंकर कृत्यांचा पर्दाफाश केला. महिला आणि सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करून हा ढोंगी बाबा त्यांचं शोषण कसं करायचा याची माहिती आता समोर आली आहे. वाचा सविस्तर
24 Mar, 26 : 02:45 PM
पुण्यात मेट्रोच्या बोगद्याला छिद्र; घरासाठी बोअरवेल घेताना घडला प्रकार
पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील भूमिगत मेट्रो बोगद्यावर थेट बोअरवेल मारण्यात आल्याने बोगद्यावर खड्डा पडला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Mar, 26 : 02:06 PM
धुळे : शिरपूर तहसील कार्यालयासमोर आजी-आजोबांचे भर उन्हात आमरण उपोषण
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या ११ महिन्यांपासून शिरपूर तहसील कार्यालयात चकरा मारणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांनी अखेर आज टोकाचे पाऊल उचलत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
24 Mar, 26 : 01:26 PM
रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर
रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. याच दरम्यान चाकणकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे, सत्य समोर येईलच" असं म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट करत व्हिडीओ देखील शेअर केला आहे. वाचा सविस्तर
24 Mar, 26 : 01:21 PM
जालना : पाण्यासाठी ग्रामस्थाचं पाण्याच्या टीकावर आमरण उपोषण
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रक येथील एका ग्रामस्थाने अनोखं आंदोलन सुरु केले आहे. गावातील पाण्याच्या टाकीवर बसून एका ग्रामस्थाने आमरण उपोषण सुरु केले आहे. मार्तड बाबुराव काळे असं या ग्रामस्थाचं नाव आहे. बोरगाव बुद्रुक येथे 15 वित्त आयोगातून झोपडपट्टी व धनगर गल्लीत पाण्याची पाईपलाईन झाली आहे. मात्र हे काम शासनाच्या निकषानुसार झालं नसून त्याची चौकशी करण्यात यावी. याशिवाय पाईपलाईन होऊनही पाणी मिळत का नाही. या मागणीसाठी या ग्रामस्थाने पिण्याच्या टाकीवरच आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचा निर्धार या ग्रामस्थाने केला आहे.
24 Mar, 26 : 12:27 PM
धर्मांतर केलं तर अनुसूचित जातीचा दर्जा कायमचा संपणार!
आरक्षणाचे फायदे आणि अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. "जर एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मात (उदा. ख्रिश्चन किंवा इस्लाम) प्रवेश करत असेल, तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येईल," असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (SC/ST Act) लाभ घेता येणार नाही.
24 Mar, 26 : 12:20 PM
दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी; अशोक खरात प्रकरणी ठाकरे सेनेचे आंदोलन
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा घ्यावा तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेतर्फे आज सावंतवाडी तालुक्यात आंदोलन करण्यात आले.
24 Mar, 26 : 12:12 PM
जेवणात पाल सापडली, कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांसमोरच खाल्ली
मध्य प्रदेशातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेलं राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ (RGPV) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतं. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील अन्नात पाल सापडल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांनी जेव्हा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला हे दाखवलं, तेव्हा त्याने ती पाल नसून 'शिमला मिरची' असल्याचं सांगितलं आणि पुरावा म्हणून तो तुकडा स्वतः खाऊन टाकला. वाचा सविस्तर
24 Mar, 26 : 12:10 PM
'लास्ट फायटर' पापा राव आज शरणागती पत्करणार
छत्तीसगडमधील नक्षलवादाचा कणा आता पूर्णपणे मोडला आहे. बस्तरला नक्षलमुक्त घोषित करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या एक आठवडा आधी, नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा 'फायटर' समजला जाणारा कमांडर पापा राव अखेर २४ मार्च रोजी शरणागती पत्करणार आहे. आपल्या साथीदारांसह आणि एके- ४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह तो पोलिसांसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे बस्तरमधील नक्षली चळवळ आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. वाचा सविस्तर
24 Mar, 26 : 11:45 AM
साताऱ्यात लोकशाहीची हत्या झाली- सुप्रिया सुळे
साताऱ्यातील राड्यावर बोलताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. "साताऱ्यात जे काही झालं ती लोकशाहीची हत्या आहे. मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहे. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांमागे जी अदृश्य शक्ती होती की त्याची ताकद आहे. अदृश्य शक्तीने हे पोलिसांना करायला सांगितलं," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
24 Mar, 26 : 11:26 AM
एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले, त्यानंतर २४ मार्च, मंगळवारी देखील मोठी घसरण नोंदवली जात आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आज सोन्याचा भाव १,३७,०३२ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,१७,०२६ रुपये प्रति किलोवर आला आहे.
सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.#gold#silverhttps://t.co/t2YCnggEf6
— Lokmat (@lokmat) March 24, 2026
24 Mar, 26 : 11:24 AM
दिल्ली रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही अन् लाईव्ह फुटेज थेट पाकिस्तानच्या हातात!
भारतीय सुरक्षेला खिंडार पाडण्याचा पाकिस्तानचा एक मोठा कट गाझियाबाद पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली आणि हरियाणातील रेल्वे स्थानकांसह संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये आतापर्यंत २२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दिल्ली रेल्वे स्थानकावर लावलेल्या कॅमेऱ्यांचे लाईव्ह एक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
24 Mar, 26 : 10:35 AM
अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरीमध्ये महाभयंकर स्फोट!
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील पोर्ट आर्थर येथील 'वलेरो एनर्जी' या प्रचंड मोठ्या तेल रिफायनरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक भीषण स्फोट झाला. रिफायनरीतील एका इंडस्ट्रियल हीटरमध्ये हा धमाका झाला असून, त्यानंतर संपूर्ण परिसरात आगीचा भडका उडाला आहे. या घटनेमुळे आकाशात काळपट धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत असून परिसरातील शहरांना मोठा धक्का बसला आहे.
24 Mar, 26 : 10:32 AM
कोलंबिया लष्करी विमान अपघात; ६६ जवानांचा मृत्यू
सोमवारी दक्षिणी अमेझॉनच्या घनदाट जंगल परिसरात कोलंबिया लष्कराचे एक मालवाहू विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली असून, २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
24 Mar, 26 : 10:29 AM
ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा
मध्यपूर्वेतील युद्धाची धग कमी होण्याची चिन्हे असतानाच आता एका मोठ्या घडामोडीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत. "आम्ही इराण आणि लेबनॉनवरील हल्ले थांबवणार नाही, तर ते अधिक तीव्र करू," अशी गर्जना नेतन्याहू यांनी केली आहे.