Top Marathi News Live: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? २६ फेब्रुवारीला अधिकृत घोषणेची शक्यता; बैठकीत हालचालींना वेग

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:18 IST2026-02-16T09:05:02+5:302026-02-17T11:18:47+5:30

भारत - अमेरिका व्यापार करारावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. हा करार म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप ...

Maharashtra Marathi News 16 February 2026: India vs. Pakistan Match, T20 world cup, BMC mayor Ritu Tawde, NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sunetra pawar, Narendra Modi, Rahul Gandhi, Bangladesh | Top Marathi News Live: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? २६ फेब्रुवारीला अधिकृत घोषणेची शक्यता; बैठकीत हालचालींना वेग

Top Marathi News Live: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? २६ फेब्रुवारीला अधिकृत घोषणेची शक्यता; बैठकीत हालचालींना वेग

भारत - अमेरिका व्यापार करारावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. हा करार म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे, तर ते खोटं बोलत असून कुठल्याही मंचावर चर्चेस आपण तयार आहोत, असं प्रतिआव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. मुंबईत बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा तापण्याची चिन्हं आहेत, तर तिकडे बांगलादेशमध्ये नवीन सरकार आल्याने शेजाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा विषय कुठल्या दिशेने जाणार, याबद्दलचा सस्पेन्स संपत नाहीये. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवून आपला दबदबा कायम ठेवला आहे. या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

16 Feb, 26 : 08:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली

आज मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या सर्वोच्च स्थानी त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

16 Feb, 26 : 08:08 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X जगभरात बंद; एका महिन्यात दुसऱ्यांदा सेवा खंडित

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) आज अचानक बंद पडले, ज्यामुळे जगभरातील लाखो युजर्स अॅप आणि वेबसाइटवर लॉग इन करू शकले नाहीत किंवा फीड लोड करू शकले नाहीत.

16 Feb, 26 : 07:42 PM

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय

मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच भाजपाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात महापौर रितू तावडे यांनीही महत्त्वपूर्ण निर्णय घेत भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना खास विनंती केली आहे. मुंबईची महापौर म्हणून मला मिळणारे मानधन मी महापौर निधीस देत असून माझ्यासहीत इतर सर्व नगरसेवकांनी, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापौर निधीस आर्थिक मदत करुन गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेमध्ये खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.

16 Feb, 26 : 07:37 PM

राजस्थानमध्ये पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन धडक कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी) तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

16 Feb, 26 : 06:53 PM

मॉस्कोमधील हॉस्टेलला भीषण आग

रशियाची राजधानी मॉस्को येथील एका हॉस्टेलमध्ये भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग इतकी वेगाने पसरली की, अडकलेल्या अनेकांना चौथ्या मजल्यावरील खिडक्यांमधून खाली उड्या माराव्या लागल्या. वाचा सविस्तर

16 Feb, 26 : 06:28 PM

T20 World Cup 2026: इटलीने दिली तगडी झुंज; अखेर इंग्लंड विजयासह सुपर-८ मध्ये!

टी२० विश्वचषक स्पर्धेतील करो वा मरोच्या सामन्यात इंग्लंडने इटलीवर निसटता विजय मिळवत सुपर-८ फेरी गाठली. प्रथम फलंदाजीत इंग्लंडने द्विशतकी मजल मारली. इटलीने तगडी झुंज देत १७८ धावा केल्या. अखेर इंग्लंडने २४ धावांनी विजय मिळवत त्यांच्या गटात विंडिजसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला.

16 Feb, 26 : 05:53 PM

मुलुंड मेट्रो दुर्घटना: दोषी कंपनीला ५ कोटींचा दंड; मृतांच्या वारसांना १५ लाखांची मदत - एकनाथ शिंदे

मुलुंड येथे मेट्रो प्रकल्पादरम्यान झालेल्या दुर्घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीला ५ कोटी रुपयांचा तर संबंधित सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना MMRDA कडून १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च MMRDA उचलणार आहे. तसेच एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांचे तातडीने स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश शिंदेंनी दिले.

16 Feb, 26 : 05:45 PM

महापौरांचे नाव FIR मधून का वगळले? पोलिसांना जाब विचारण्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा

पुण्यात रविवारी झालेल्या भाजपच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी भाजपवर राजकीय दहशतवाद माजवल्याचा आरोप केला. मुख्य रस्ता २ तास अडवून धरला असतानाही पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखले नाही. हापौरांनी प्रक्षोभक भाषण करूनही त्यांचे नाव FIR मधून वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच हे घडले का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. या विरोधात काँग्रेस पुणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा' काढणार असून सर्व पुराव्यासह मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

16 Feb, 26 : 05:16 PM

मध्य रेल्वेच्या सीएसएमटीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या रुळांवर झोपला कचरा वेचक. दुपारच्या सत्रात रेल्वेसेवा काही काळ खोळंबली

16 Feb, 26 : 05:09 PM

अल्पवयीन मुलाच्या वेगाचा बळी; १० दिवसांच्या झुंजीनंतर ध्रुमिल पटेल यांचा मृत्यू

विद्याविहार येथे कारच्या धडकेत जखमी झालेल्या ध्रुमिल पटेल यांचा १० दिवसांच्या  उपचारानंतर मृत्यू झाला. ध्रुमिल पटेल हे पत्नीसह स्कूटीवरुन घरी परतत असताना एका अल्पवयीन मुलाने त्यांना जोरदार धडक दिली.  याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी वाचा... 

16 Feb, 26 : 05:06 PM

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले

काँग्रेस भवन परिसरात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. दगडफेकीची घटना घडल्यानंतर या प्रकरणी भारतीय जनता पक्षासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्या. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

16 Feb, 26 : 03:08 PM

अजित पवार अपघात प्रकरणातील 'ब्लॅक बॉक्स'बाबत महत्त्वाची अपडेट

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. तशातच आता त्या विमानातील 'ब्लॅक बॉक्स'बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशी पाठवण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

16 Feb, 26 : 03:07 PM

राज्यातील ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा, वादग्रस्त निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती 

अजित पवारांचे निधन झाल्यानंतर काही दिवसात मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे प्रकरण समोर आले. यातील २५ शाळा एकाच संस्थेच्या आहेत. अजित पवारांनी या फाईल्स रोखून ठेवल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यावर सह्या केल्या गेल्या. 

या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून, या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परस्पर शाळांना अल्पसंख्यांक दर्जाचे वाटप केल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकारला घेरले आहे. 

16 Feb, 26 : 02:49 PM

BMCने भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल

भारतीय जनता पार्टीने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवले. सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई पालिकेत भाजपने रितू तावडे यांच्या माध्यमातून पहिली महिला महापौर बसवली. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसताच भ्रष्टाचाराविरोधात पहिले पाऊल उचलण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली. शालेय वस्तूंची खरेदी आणि जेंडर बजेट अंतर्गत होणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या जेम (Government e-Marketplace) पोर्टलचा तातडीने अवलंब करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली. महापालिकेत दीर्घकाळ भ्रष्टाचार सुरु असून तो रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

16 Feb, 26 : 01:48 PM

रसायन कारखान्यात स्फोट, सात कामगारांचे मृतदेहच मिळाले

राजस्थानातील खैरथल-तिजारा जिल्ह्यात असलेल्या भिवाडीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रसायने तयार करणाऱ्या कंपनीच्या कारखान्यात स्फोट होऊ आग लागली. यात ७ जणांचा जळून मृत्यू झाला. त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. 

16 Feb, 26 : 01:15 PM

गणेश नाईकांवर आमदार निलेश राणे यांचा पलटवार; पोस्ट करत डिवचले

राज्याचे वनमंत्री आणि भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्यावर आमदार निलेश राणे यांनी टीकास्त्र डागले आहे. 

"मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो, कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसे नाहीत, साधनसामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय", असे निलेश राणे म्हणाले.

"वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत", अशी टीका निलेश राणेंनी गणेश नाईकांवर केली. 

16 Feb, 26 : 12:42 PM

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला राजस्थानमधून अटक केली असून त्याला मुंबईत आणलं जात आहे. पोलीस आजच त्याला न्यायालयात हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

16 Feb, 26 : 12:25 PM

अबु सालेमची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कुख्यात गँगस्टर अबु सालेमला सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. प्रत्यार्पण अटीनुसार २५ वर्षाहून अधिक काळ शिक्षा होऊ शकत नाही असा दावा सालेमच्या वकिलांनी कोर्टात केला. मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यात सुप्रीम कोर्टाने नकार दिला. नाशिक जेलमधून मिळालेल्या दस्तावेजानुसार याची सुनावणी हायकोर्टात होईल असं कोर्टाने म्हटलं. त्याशिवाय हायकोर्टाला लवकर सुनावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. 

16 Feb, 26 : 12:15 PM

​कोराडीत साकारणार देशातील सर्वात उंच १५८ फुट भव्य हनुमान मूर्ती!

विदर्भाची शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसराचा आता केवळ धार्मिक केंद्र म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणाचे एक व्यापक संकुल म्हणून विकास होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच या विकासकामांची पाहणी केली. याठिकाणी १५८ फूट उंच हनुमान मूर्ती उभारण्यात येत आहे. मंदिर परिसरातील तलाव क्र. ३ मध्ये भारतातील भव्य आरसीसी हनुमान मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मूर्तीवर आकर्षक 'लेझर प्रोजेक्शन मॅपिंग' आणि तलावात 'अंडर वॉटर लायटिंग' केले जाणार आहे.

 

16 Feb, 26 : 12:13 PM

राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीला आग, ७ कामगारांचा मृत्यू

राजस्थानच्या भिवाडी येथील खुशखेडा औद्योगिक क्षेत्रात सोमवारी सकाळी एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही आग प्लॉट नंबर G1/118B मध्ये लागल्याचं सांगण्यात येत असून केमिकलच्या साठ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं. बचावकार्यादरम्यान आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  वाचा सविस्तर

16 Feb, 26 : 12:07 PM

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार: राजस्थानमधून सहा जणांना अटक

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणाचे कनेक्शन राजस्थानपर्यंत पोहोचले असून, आणखी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींचा आकडा ११ वर गेला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबद्दलची माहिती दिली. 

16 Feb, 26 : 11:26 AM

"सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे की नाही", रोहित पवारांचा संताप

अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या काही तासानंतरच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर आले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांपासून या प्रक्रियेला अजित पवारांकडून स्थगिती दिली गेली होती. पण, त्यांच्या निधनानंतर लगेच दर्जा दिल्याच्या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. 

"सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही?", अशा शब्दात रोहित पवारांनी खंत व्यक्त केली. 

16 Feb, 26 : 10:30 AM

'भैरव' हे केवळ एक नाही तर नवी ओळख

भारतीय सैन्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजात भैरव बटालियनची ताकद दाखवण्यात आली आहे. "न कोई आहट, न कोई छाया, न कोई संकेत, न कोई काया...। मैं काल नहीं, काल का विधान, भैरव नाम नहीं, पहचान" या शब्दात भैरव बटालियनची ओळख करून देण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त भैरव बटालियनचा हा शॉर्ट व्हिडिओ सैन्याने प्रसिद्ध केला. सैन्याने अलीकडेच भैरव बटालियन तयार केले आहे. त्यात सैन्याने जागतिक संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवांचा समावेश केला आहे. भैरव ही आधुनिक युद्धाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बनवलेली विशेष तुकडी आहे. जे शत्रूंना टार्गेट करण्याची क्षमता ठेवते.   

16 Feb, 26 : 10:24 AM

सरकारने दोन कोटी द्यावे, सरपंचाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचा नकार

मुलुंडमध्ये शनिवारी मेट्रोच्या मार्गिकेवरील कठडा कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातून मुंबई लग्नासाठी आले होते. लग्नाला जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. 

त्यांच्या कुटुंबीयांकडून २ कोटी रुपये मदत म्हणून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे. 

कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अपघात झालेल्या ठिकाणी रविवारी आंदोलन केले. पोलीस त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पण, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे कुटुंबीय आणि नातेवाईक म्हणाले. 

16 Feb, 26 : 10:14 AM

लाच प्रकरण: झिरवळांच्या कार्यालयातील लिपिकाच्या घरातून कागदपत्रे जप्त

मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना लिपीक राजेंद्र ढेरिंगे याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक रोड येथील घरावर छापा टाकला. त्यांच्या घरातून एसीबीला काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. 

16 Feb, 26 : 09:48 AM

तामिळनाडू दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, उदयनिधी यांचा इशारा

ही विधानसभा निवडणूक दिल्लीविरुद्ध तामिळनाडूच्या अस्मितेशी आहे. सामाजिक न्यायासोबत तामिळ लोकांवर हिंदी लादण्याविरोधात ही लढाई आहे. या लढाईत आपण कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिले पाहिजे की तामिळनाडू कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. आपला इतिहास आपल्या बाजूने आहे. येणारा विजय हा उगवत्या सूर्याच्या चिन्हाचाच असेल असं तंजावर येथे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं. 

16 Feb, 26 : 09:42 AM

मुंबईतील धक्कादायक प्रकार, दीड वर्षीय मुलीवर अत्याचार

बोरिवली पश्चिमेकडील एमएचबी पोलीस स्टेशन हद्दीत एका दीड वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीला घेऊन जाणाऱ्या आरोपीचा चेहरा दिसला. तो पीडित कुटुंबाच्या ओळखीचा होता. आम्हाला न्याय हवा, दुसरे काही नको अशी विनवणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. 

Web Title: Maharashtra Marathi News 16 February 2026: India vs. Pakistan Match, T20 world cup, BMC mayor Ritu Tawde, NCP merger, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sunetra pawar, Narendra Modi, Rahul Gandhi, Bangladesh