Maharashtra Elections 2019: Mumbai, Konkan in front; Will the Western Maharashtra save the Congress-NCP? | महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 
महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलेलं आहे, सगळ्यांना निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता आहे. मात्र वृत्तवाहिन्यांनी दाखविलेले एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आजतक-एक्सिस इंडिया यांच्या सर्व्हेनुसार महायुतीला १६६-१९४ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. 

या पोलमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ७२ ते ९० जागा मिळेल असा अंदाज दिला आहे. पण शिवसेनेला या पोलमधून ५७ ते ७० जागा निवडून येतील असं सांगण्यात आलं आहे. भाजपाच्या खात्यात १०९ ते १२४ जागा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकीकडे महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना पाहायला मिळत आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळताना दिसत आहे. आजतक एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला २२ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला २९ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

तसेच या पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील ३६ जागांपैकी ३० जागांवर शिवसेना-भाजपाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत ३ जागा तर अन्य जागांवर ३ जणांना संधी मिळताना पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात भाजपा-शिवसेनेला २९ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला ६ जागांवर समाधान मानावं लागत आहे.

मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचं वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Maharashtra Elections 2019: Mumbai, Konkan in front; Will the Western Maharashtra save the Congress-NCP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.