Maharashtra MLC Elections: सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांबाबत चर्चा सुरू आहे. याचबाबत बोलताना उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला उद्देशून मतं सांभाळण्याचा सल्ला दिला. या विधानाला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. "विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणाचे नाही. हे फक्त पैशाचे काम आहे. त्यामुळे मते सांभाळा, असा संजय राऊत यांनी दिलेला सल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना एकप्रकारे दिलेला इशारा आहे की विधान परिषदेला तुम्ही उभे राहिलात तर उबाठा गटाची, महाविकास आघाडीची मते फुटतील आणि तुमचा पराभव होऊ शकतो. महाविकास आघाडीत तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला असल्याने विधान परिषदेत महाविकास आघाडीत एकमत होण्याची शक्यता कमी असून उबाठा गट तसेच महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत," असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.
"संजय राऊतांनी उल्लेख केल्याप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे बाळंतपणाची खोली आहे का? तुमच्या पक्षाची वांझोटी भूमिका पाहून महाराष्ट्राने तुम्हाला नाकारले. जनतेची कामे केली नसल्याने जनतेने विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला भोपळाही फोडता आला नसल्याने तुम्ही जनतेच्या दृष्टीने वांझोटे झालेले आहात. महायुती म्हणून आम्ही अतिशय भक्कम आणि मजबूत आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमची काय अवस्था आहे ते पहा. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडण्यासाठी काँग्रेसने अट घातली आहे की पुढील वेळेला राज्यसभेची जागा संजय राऊत यांच्याऐवजी काँग्रेसला द्या. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार हे महायुती म्हणून एक आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची चिंता करा," असे त्यांनी सुनावले.
"पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुठेही मतदारांवर दबाव नाही. दबाव असता तर पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात ९५ टक्के मतदान झाले असते का? ममतादीदींच्या गुंडांकडून तिथे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या झाली. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तिथे निमलष्करी दल तैनात करावे लागल्याने इंडिया आघाडीत काय सुरू आहे ते पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. संजय राऊत यांनी मणिपूरच्या गप्पा करू नयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते. आपल्याला चंद्रपूर सांभाळता आले नाही आणि आपण मणिपूरच्या गप्पा मारता. चंद्रपूर महापालिकेतील नगरसेवक हाताळता आले नाहीत. तिथे तुम्हाला आणि काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही," असे ते म्हणाले.
"पंतप्रधान मोदी काही उद्धव ठाकरे नाहीत. महाराष्ट्रात विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे घरात बसून होते. निवडणुकीत आपण घरात बसायचे आणि कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही लढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांसाठी संघर्ष करणारे, कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरणारे आहेत तुमच्यासारखे घरात बसणारे नाहीत", असेही बन यांनी सुनावले.
Web Summary : BJP countered Sanjay Raut's advice regarding election votes, suggesting it was a veiled warning to Uddhav Thackeray about potential defections and defeat in the Legislative Council. They criticized Thackeray's leadership and Maha Vikas Aghadi's unity.
Web Summary : भाजपा ने संजय राउत की चुनाव वोटों पर सलाह का जवाब दिया, और सुझाव दिया कि यह उद्धव ठाकरे को विधान परिषद में संभावित दलबदल और हार के बारे में एक छिपी चेतावनी थी। उन्होंने ठाकरे के नेतृत्व और महा विकास अघाड़ी की एकता की आलोचना की।