उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण आग लागली आहे. या आगीत तब्बल ७० झोपड्या जळून खाक झाल्या. पिलखुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदीनगर रोडवरील एका कापड कारखान्याजवळ असलेल्या झोपडपट्टीत सकाळी ही आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं. ही आग इतकी भीषण होती की ती आसपासच्या गोदामांपर्यंत आणि कारखान्यांपर्यंत पसरली, ज्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
हापूरपासून पिलखुवा येथील अर्जुननगरचं अंतर १० किलोमीटर आहे. या आगीचं भीषण स्वरूप इतकं होतं की, धुराचे लोट १० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ च्या सुमारास झोपड्यांमध्ये असलेलं प्लास्टिक, पॉलिथिन, लाकूड आणि भंगार यांसारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग अधिकच भडकली. ही आग पसरत जाऊन जवळच असलेल्या 'गायत्री लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट', 'युनायटेड ट्रान्सपोर्ट' आणि एका जीन्स शिवण्याच्या कारखान्यापर्यंत पोहोचली. गोदामांमध्ये असलेला मोठ्या प्रमाणावरील कापडाचा साठा जळून खाक झाला आहे.
सामान, कपडे, पैसे, महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक
८ अग्निशमन गाड्यांनी अनेक तास अथक परिश्रम केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना वेळेत सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीत झोपड्यांमधील घरगुती सामान, कपडे, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत, ज्यामुळे या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचं मोठं संकट उभं राहिलं आहे. सर्कल ऑफिसर (CO) अनिता चौहान यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, आग लागण्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कोट्यवधींचं नुकसान
प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कोट्यवधी रुपयांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे. या झोपडपट्टीत राहणारे अनेक लोक मूळचे पश्चिम बंगालचे असून ते मतदानासाठी आपल्या गावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत ही घटना घडल्याने त्यांची महत्त्वाची कागदपत्रंही जळाली आहेत. प्रशासनासमोर आता या बाधितांच्या पुनर्वसनाचे मोठं आव्हान आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत आणि निवाऱ्याची सोय करण्याची मागणी केली आहे.
Web Summary : A massive fire in Hapur, Uttar Pradesh, destroyed 70 huts and two factories. The blaze, fueled by flammable materials, caused extensive damage. No casualties were reported as residents were evacuated. An investigation is underway to determine the cause.
Web Summary : उत्तर प्रदेश के हापुड़ में भीषण आग लगने से 70 झोपड़ियां और दो कारखाने जलकर खाक हो गए। ज्वलनशील पदार्थों से आग और भड़क गई, जिससे भारी नुकसान हुआ। निवासियों को सुरक्षित निकाला गया। आग लगने के कारणों की जांच जारी है।