अवकाळी, गारपिटीने पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:38 IST2026-03-20T07:37:37+5:302026-03-20T07:38:28+5:30
विजेच्या कडकडाटासह सुमारे तासभर पावसाचा मारा, शेतात साठवलेल्या कांद्याचे नुकसान; गहू, हरभरा भुईसपाट, केळींना फटका

अवकाळी, गारपिटीने पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीचा जोरदार तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या बदलत्या हवामानामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा तसेच आंब्यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांत गारपीट व पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात वीज पडून जनावरे दगावल्याचीही प्राथमिक माहिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा, पारनेर, पाथर्डी भागात गारपीट झाली असून कांदा, गहू, मका पिकांसह चाऱ्याचे नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात बार्शी आणि माढा तालुक्यांतदेखील गारांचा पाऊस पडून द्राक्ष, ज्वारी, गहू आणि कांद्याचे नुकसान झाले.
मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा
मराठवाड्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात वीज पडून पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अहिल्यानगरमध्ये चाऱ्याची हानी, झाडे उन्मळून पडली -
जिल्ह्यातील नेवासा, पारनेर, पाथर्डी, अहिल्यानगर तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वारा आणि गारांसह पाऊस झाला. या अवकाळी पावसाने गहू, मका पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. पाचेगाव भागात गारपीट झाली. कांदा झाकण्यासाठी, तसेच गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसभर लगबग सुरू होती.
अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, गहू, मका पिकांसह चारा पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पाथर्डी तालुक्यात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह गारपीट झाली.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माढा तालुक्याला दणका
जिल्ह्यातील बार्शी आणि माढा तालुक्यांत गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. माढा तालुक्यातील मोडनिंब व अरण, बावी या परिसरात अर्धा तास गारांचा पाऊस पडला. यामुळे द्राक्ष, गहू, ज्वारी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यातील कुसळंब, पांगरी, कारी परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसात कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नसलीतरी शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करावेत, अशी मागणी केली जात आहे.
नाशिकला दुसऱ्या दिवशीही तडाखा
जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. गुरुवारी (दि.१९) ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे पिके आडवी झाल्याने बळीराजा हताश झाला आहे.
मालेगाव शहर व तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या संध्येला साडेपाचच्या सुमारास तब्बल एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीटही झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नामपूरसह मोसम खोऱ्यात पावसासह गारपीट झाली. सटाणा तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.