Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:50 AM2020-03-16T06:50:05+5:302020-03-16T07:05:13+5:30

प्रसारमाध्यमांनी कोविड-१९ च्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांची मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहेत, तेवढे गैरसमजही आहेत.

Coronavirus: Myths and Misconceptions about Corona Virus Infection | Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

googlenewsNext

- डॉ. जय देशमुख
(एमडी, एफसीपीएस,एमएनएएमएस)

भारतीय आरोग्य व्यवस्था आतापर्यंत कोरोना व्हायरसचा सामना चांगल्या पद्धतीने करीत आहे. परंतु चुकीच्या सूचनांमुळे समाजात दहशतीचे वातावरण आहे. कोरोना सार्वजनिक आरोग्यावरील संकट ठरले आहे. व्हायरसची उत्पत्ती, व्हॅक्सीनची उपलब्धता, विविध उपचारांचे दावे आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी मास्कचा वापर करण्यास सांगण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांनी कोविड-१९ च्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांची मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहेत, तेवढे गैरसमजही आहेत.

घरगुती उपचारामुळे कोरोनाचे संक्रमण बरे होते काय?
लसूण, गरम पाण्याने गुळणी करणे, व्हिटॅमिन सी, स्टेरॉईड घेणे असा सल्ला सोशल मीडियावर देण्यात येत आहेत. हा सल्ला काही आजारांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु कोरोना व्हायरससाठी हा सल्ला योग्य नाही. नागरिकांनी शरीरावर तिळाचे तेल, क्लोरीन किवा अल्कोहोलचा स्प्रे मारणे सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे दिलासा मिळत नाही. ब्लीचसह ७५ टक्के इथेनॉल पॅरासिटीक अ‍ॅसिड आणि क्लोरोफार्मसारखे काही किटाणुनाशक आहेत, जे कोरोना व्हायरस नष्ट करू शकतात, परंतु कोणतेही किटाणुनाशक पिणे योग्य नाही. ते धोक्याचे ठरू शकते.

कोरोना व्हायरसवर उपचार आहे काय?
कोविड १९ व्हायरसवर कोणताच उपचार उपलब्ध नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. लस उपलब्ध होण्यास एक वर्षापेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला आहे, त्यांच्यापासून एक मीटर अंतर ठेवणे हा स्वत:चा बचाव करण्याचा सोपा मार्ग आहे. इतरांशी हात मिळविणे टाळा. कमीतकमी २० सेकंद आपले हात साबणाने धुवावे, खोकला किंवा शिंक आल्यास आपले तोंड आणि नाकावर रुमाल ठेवावा.

मास्क वापरणे आवश्यक आहे काय?
ज्यांचे आरोग्य चांगले आहे, त्यांना मास्क वापरण्याची गरज नाही. मास्क योग्य पद्धतीने न घातल्यास संक्रमणाचा धोका वाढू शकतो. ज्यांना गरज आहे, त्यांना उपलब्ध होण्यासाठी एन ९५ रेस्पिरेटरचा साठा करू नये. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, जे दुसऱ्याला संक्रमित करण्याची शक्यता आहे आणि रुग्णांची देखभाल करणाऱ्यांनी मास्क वापरावा.

तापमानामुळे व्हायरस नष्ट  होतो का?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हँड ड्रायरने व्हायरस नष्ट होत नाही. अल्ट्रा व्हायलेट किरणेही योग्य नाहीत. ते त्वचेला इजा पोहोचवू शकतात. याची पुष्टी करण्याची कोणतीच पद्धत नाही. उन्हाळ्यात तापमान वाढल्यास व्हायरस नष्ट होतो.

कोरोना व्हायरसमुळे मुले संक्रमित होतात का?
ही एक अफवा आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतो. वयस्क आणि ज्यांना आधीच आजार आहे, त्यांना संक्रमणाचा अधिक धोका असतो, तसेच ज्यांना मधुमेह, हृदयाचा आजार, गंभीर अस्थमा, सीओपीडी असेल तरसेच दीर्घकाळापासून  औषधोपचार घेत असतील, त्यांना धोका अधिक असतो. 

कोरोना व्हायरसमुळे संक्रमित सर्वांचाच मृत्यू होतो का?
असे नाही. प्रत्यक्षात यातील बरेच रुग्ण बरे होतात. याच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, घशात खवखव आणि डोकेदुखीचा समावेश आहे. यातील बहुतेक लक्षणे एका आठवड्यातच बरी होतात. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांना धोका असतो. संक्रमितांपैकी ९७ टक्के रुग्ण बरे होतात. 

हा आजार जाणीवपूर्वक पसरविला आहे का?
अनेक व्हायरस वेळेनुसार बदलतात. मात्र, कधी-कधी डुक्कर, मांजर, पक्षी यांच्या शरीरात असलेल्या व्हायरसचा माणसाच्या शरीरात प्रवेश झाला, तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. 

मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते का?
एन ९५ प्रकारच्या काही मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते. तोंड आणि नाक झाकण्यासाठी आपण दुपट्टा किंवा रुमालाचा मास्कसारखा उपयोग करीत असाल, तर आजाराला आपण रोखू शकणार नाही. प्रत्येक वेळी नाकावर आणि तोंंडावर मास्क चढवून ठेवल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. 

हा कोरोना आजार महामारी ठरेल काय?
सध्या तरी असे म्हणता येणार नाही. मात्र, ज्या चीनमध्ये या आजाराचा जन्म झाला, ते पाहू जाता संक्रमण थांबविण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो. अन्य व्हायरल संक्रमणाच्या तुलनेत कोरोनामुळे होणारा मृत्युदर बराच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय करायला हवा.  

 

Web Title: Coronavirus: Myths and Misconceptions about Corona Virus Infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.