महिलांच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका दुटप्पी, नीलम गोऱ्हे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 19:40 IST2026-04-21T19:39:22+5:302026-04-21T19:40:34+5:30
Neelam Gorhe News: लोकसभेच्या अलीकडील अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकासंदर्भात होणाऱ्या बदलांना पुरेसे बहुमत मिळू शकणार नसल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

महिलांच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका दुटप्पी, नीलम गोऱ्हे यांची टीका
मुंबई - लोकसभेच्या अलीकडील अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकासंदर्भात होणाऱ्या बदलांना पुरेसे बहुमत मिळू शकणार नसल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. एका महिला खासदारांनी माध्यमांमध्ये बोलताना राजीव गांधींनी १९८८ सालीच महिला आरक्षण देण्यात आले होते, असा दावा केल्याचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्या काळात असे कोणतेही विधेयक अस्तित्वात नव्हते. “मी स्वतः १९८३-८४ पासून महिला चळवळीत कार्यरत आहे. १९८८ मध्ये ‘नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन’च्या बैठका झाल्या होत्या, मात्र महिला आरक्षणाचा कायदा तेव्हा आलेलाच नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण मिळावे यासाठी देशभरातील महिला चळवळीने सातत्याने संघर्ष केला. त्यातूनच ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती १९९२-९३ मध्ये मंजूर झाली, हे त्यांनी नमूद केले. मात्र त्यानंतरही १९९६ पासून ते २०२३ पर्यंत लोकसभेत महिला आरक्षण विधेयकासाठी काँग्रेसने कधीही ठोस राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही, असा आरोप त्यांनी केला. “आज महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसकडून ‘पुतना मावशीचे प्रेम’ दाखवले जात आहे. महिलांनी हा खोटा डाव ओळखला पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.
एनडीए सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. “महिलांना राजकारणात न्याय व प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी एनडीए ,शिवसेना व महीयुतीतील पक्षांचा लढा कायम राहील,” असे त्या शेवटी म्हणाल्या.