सहकार महामंडळ देणार कृषी उद्योगाला बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:46 AM2019-12-11T10:46:23+5:302019-12-11T10:51:20+5:30

सरकारी कार्यालयातील हेलपाटे थांबणार...

Co-operative corporation will strengthen agricultural industry | सहकार महामंडळ देणार कृषी उद्योगाला बळ

सहकार महामंडळ देणार कृषी उद्योगाला बळ

Next
ठळक मुद्देव्यवसायवृद्धी कक्षाची स्थापना : व्यवसाय परवान्यापासून ते बाजारपेठ मिळवून देणारशेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि शेतकरी गटासाठी सेवा व सुविधा अल्पदरात देणार

विशाल शिर्के- 
पुणे : कृषी उत्पादने व शेतमाल प्रक्रिया उद्योगाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने कृषी व्यवसायवृद्धी कक्षाची स्थापना केली आहे. या माध्यमातून कृषी आणि पूरक व्यवसायांना परवान्यापासून प्रकल्प उभारणी, पतपुरवठा साहाय्य, खरेदीदारांची भेट आणि बाजारपेठ मिळविण्यासाठी साहाय्य करण्याची सुविधा एका छताखाली मिळणार आहे. 
सहकार विकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि शेतकरी गटासाठी सेवा व सुविधा अल्पदरात देणार आहे. त्यामधे कृषी व पूरक व्यवसायाचे प्रस्ताव आणि प्रकल्प अहवाल तयार करणे, त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था यांची नोंदणी करणे, व्यवसायास आवश्यक विविध परवाने काढून देणे, प्रकल्प उभारणीसाठी तांत्रिक साहाय्य करणार आहे. संबंधित संस्थेच्या क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, उत्पादित मालाची जाहिरात करणे, वेष्टन, लेबल याची माहितीही दिली जाणार आहे. तसेच, एखाद्या उत्पादक कंपनीच्या सुरू असलेल्या व्यवसायाला गती देण्याचे कामदेखील करण्यात येईल. 
....
सरकारी कार्यालयातील हेलपाटे थांबणार
पुढील टप्प्यात खरेदीदार, प्रक्रियादार, निर्यातदार यांच्याशी संपर्क साधून देणे, व्यवसाय विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे याची माहिती संबंधितांना दिली जाईल. म्हणजेच एखाद्या उत्पादक कंपनीला व्यवसाय परवाना मिळवून देण्यापासून ते बाजारपेठ शोधून देण्यापर्यंत कृषी व्यवसायवृद्धी कक्ष काम करणार आहे. त्यामुळे एखाद्या नवउद्योजक संस्थेला परवाने व विविध व्यवसाय परवानग्या मिळविण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांच्या कक्षात फिरण्याची गरज संपणार आहे. 
कृषी कक्षाने सांगितलेली कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी लागतील. याव्यतिरिक्त गोदाम पावती योजना, गोदामातील मालाचे विक्री व्यवस्थापन, गोदाम व्यवसाय उभारणी प्रशिक्षण, गोदामांचे आधुनिकीकरण (सॉफ्टवेअर, डिजिटल उपकरणे) याची माहिती देखील संबंधितांना दिली जाईल. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आक्रे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
...........
कृषी उत्पादक कंपन्या, गट, सहकारी संस्थांना कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक असणाºया सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. व्यवसाय आराखडा तयार करून देण्यापासून परवाना व त्यानंतर व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवून दिले जाईल. याशिवाय दर सोमवारी ग्राहक व उत्पादकांची बैठक बोलावली जाते. ग्राहकांशी जोडून देण्याचे 
कामही करण्यात येईल. दर महिन्याच्या २० तारखेला नाममात्र दरात प्रशिक्षण शिबिरदेखील आयोजित केले जाणार आहे. - विजय गोफणे, राज्य व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकार विकास. महामंडळ
.............
 

Web Title: Co-operative corporation will strengthen agricultural industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.