CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:13 IST2026-03-20T15:13:09+5:302026-03-20T15:13:54+5:30
भाजपाची ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे.

CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का
सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीने महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपाने आणलेल्या ट्विस्टने पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाने केलेल्या खेळीने सत्ता समीकरणाला कलाटणी मिळाली. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ २८ सदस्यांपर्यंत मर्यादित असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी अचूक राजकीय रणनीतीने अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण ३३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाच्या बाजूने वळवला. याउलट शिंदेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी गटाला केवळ ३० मते मिळाली. ज्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले. या निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केल्याचे स्पष्ट झालं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर भाजपाचा डाव
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपाने बाजी मारण्यामागे सर्वात मोठा हात सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे यांचा असल्याचे बोलले जाते. शिवेंद्रराजेंची ही धुरंधर राजकीय खेळी मानली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजपाने बाजी उलटवली असल्याचे समोर आले आहे. भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एका मताने थरारक विजय हा साताऱ्यात भाजपाचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा विजय ठरला आहे. भाजपाची ही राजकीय खेळी सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ असे बहुमत असतानाही भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. सातारा जिल्हा परिषद सत्तेसाठी भाजपाने शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार फील्डिंग लावली होती. दुसरीकडे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील समन्वय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण यामध्ये भाजपाने मोठे यश मिळवत महायुतीतील मित्रपक्षांनाच धक्का दिला आहे.